Sangli Samachar

The Janshakti News

महायुतीतील उर्वरित ६ जागा शिंदे गटाला ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० एप्रिल २०२४
महायुतीतील अद्याप उमेदवार जाहीर न करण्यात आलेल्या 6 जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढवणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून उर्वरित जागांवर महायुतीमध्ये खलबतं सुरु आहेत. खास करुन नाशिकच्या जागेचा पेच अद्याप मिटलेला नाही. मात्र, उर्वरित सर्व जागा शिंदेंची शिवसेना लढेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दक्षिण मुंबई आणि पालघरच्या जागेवर भाजपकडून दावा करण्यात आला होता. मात्र हे पारंपारिक मतदारसंघ शिवसेनेचे असल्याने उर्वरित 6 जागा शिवसेना लढवणार असल्याची माहिती आहे. दक्षिण मुंबईतून लोकसभेसाठी राहुल नार्वेकर इच्छुक आहेत. मात्र त्यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढावे, अशी शिवसेनेच्या नेत्यांची मागणी आहे.

राहुल नार्वेकर भाजपच्या चिन्हावर लढण्याबाबत ठाम आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने दक्षिण मुंबईतून निष्ठावंत शिवसैनिक आणि विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण मुंबईत महायुती कोणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.


उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने गजानन किर्तिकर यांचे पुत्र अमोल किर्तिकर यांना मैदानात उतरवले आहे. विशेष म्हणजे गजानन किर्तीकर हे ठाकरे गटात असताना देखील अमोल किर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. रवींद्र वायकर यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. पालघरमधून राजेंद्र गावित यांचे नाव चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या भारती कांबडींविरोधात ते लढू शकतात.

मात्र, एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे मतदारसंघात अद्याप महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाही. ठाकरेंनी ठाण्यातून निष्ठावंत शिवसैनिक राजन विचारे यांना मैदानात उतरवले आहे. ठाण्यात प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्केंच्या नावाची चर्चा सुरू असून सरनाईक याचे पारडं जड असल्याचे बोलले जात आहे.