Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीच्या दौऱ्यात संजय राऊत यांना काय (हात) गवसणार का ?सांगली समाचार - दि. ५ एप्रिल २०२४
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली दौऱ्यावर आहेत. आपण मतदारसंघाचा आढावा घेण्याबरोबरच काँग्रेस नेत्यांची समजूत घालू असा विश्वास व्यक्त करीत असतानाच, "आलात तर तुमच्याबरोबर अन्यथा एकटे लढू!" असा शिवसेना टाईपने इशारा दिल्यामुळे ते "काँग्रेस नेत्यांची समजूत कशी घालणार ?" असा प्रश्न उपस्थित होत आहे.

काँग्रेसचा पंतप्रधान बनवण्यासाठी एक एक जागा निवडून आणणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पक्षाने राष्ट्रीय पातळीवरील राजकारण करावे, गल्लीत फार लक्ष घालू नये. आला तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या शिवाय निवडणूक लढवली जाईल. हिंदकेसरीने गल्लीतली कुस्ती खेळू नये. तुम्ही राष्ट्रीय पक्ष आहात, त्या उंचीवर राहा. सांगलीतले आम्ही बघून घेऊ”, असा इशारा शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.

इंडिया आघाडीमध्ये शिवसेना किंवा शरद पवार हे पंतप्रधान बनणार नाहीत तर काँग्रेसचाच पंतप्रधान बनणार आहे. मग अशा परिस्थितीत रुसवे फुगवे योग्य नाहीत. अन्य मतदारसंघ आम्ही जिंकत असून सुद्धा ते काँग्रेसला दिले मग सांगली बाबत नाराजी असण्याचे काही नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

सांगली आणि भिवंडी या दोन मतदारसंघाचे विषय आता संपले आहेत. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला असून प्रचारही सुरू केला आहे. आम्हीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून त्यांचा प्रचार करणार आहोत. तसे काँग्रेसने आमच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांच्या पाठिशी उभे राहायला हवे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

काँग्रेस नेत्यांसह विशाल पाटील यांची समजूत घालण्यासाठी आलेले राऊत जर अशा पद्धतीने अरेरावीची ठाकरी भाषा करत असतील ? तर वाद मिटण्याऐवजी तो अधिकच पेटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.