| सांगली समाचार वृत्त |
पुसद - दि.२५ एप्रिल २०२४
लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरूवात झाली असून राज्यासह देशभरात प्रचार सभांनाही वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांचेही राजकारण या काळात सुरूच आहे. अशातच कशाचीही तमा न बाळगता राजकीय नेते आपल्या प्रचारसभा घेतायतं. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता सर्वच राजकीयनेते प्रचार सभांना हजेरी लावत आहेत.
गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भर सभेत चक्कर आल्याची घटना घडली होती आणि आज यवतमाळच्या पुसद येथे देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज यवतमाळच्या पुसद येथे आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाच्या आयोजनानुसार नितीन गडकरी भाषणासाठी आले आता त्यांना अचानक भोवळ आल्याचे कळताच त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना मंचावरून बाजूला नेले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कळते आहे. मात्र, थोडावेळ आराम केल्यानंतर ते पुन्हा भाषणाला उभे राहिल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे ते पुढील सभेतही भाषण करणार आहेत. हरिवंशयराय बच्चन यांच्या अग्निपथ कवितेतील तू न रुकेगा कभी… तू न थकेगा कभी…ओळींप्रमाणे भोवळ आल्यानंतरही गडकरींनी पुन्हा उठून आपलं भाषण पूर्ण केलं.
व्यासपीठासमोर उपस्थित असलेल्या हजारो लोकांसमोर आपलं विकासाचं व्हिजन मांडलं. गडकरींची ही ऊर्जाशक्ती आणि कामाप्रतीची समर्पण भावना पाहून उपस्थितांनीही टाळ्या वाजवून दाद दिली.