Sangli Samachar

The Janshakti News

कोट्यवधी रुपये घेऊन कॉलेजचे कर्मचारी फरारसांगली समाचार - दि ६ एप्रिल २०२४
पुणे - वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी भरलेली शैक्षणिक शुल्काची (फी ) लाखो रुपयांची ( डोनेशन ) रक्कम घेऊन दोन कर्मचारी फरार झाले आहेत. त्यामुळे कॉलेजमध्ये प्रचंड मोठी खळबळ माजली आहे. मागील महिनाभरापासून दोन्ही कर्मचारी फरार असून त्यांच्या कुटुंबीयांकडे अपहाराची रक्कम जमा करण्यासाठी तगादा लावला आहे. कॉलेजमध्ये झालेल्या अपहार रकमेत विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या कोट्यवधींच्या डोनेशनची रक्कम असण्याची शक्यता आहे. यामुळे अपहाराची रक्कम कोटींच्या घरात असू शकते. त्यामुळे प्रशासनाकडून अद्याप अपहाराची पोलिसांत तक्रार दिलेली नाही.

वाघोली परिसरात बायफ रस्त्यावर पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे. माजी आमदार रामभाऊ मोझे यांनी सन २००६ मध्ये कॉलेजची स्थापना केली आहे. कॉलेजमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशल इंटेलिजन्स, इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन, एमबीए, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे शिक्षण दिले जाते.


कॉलेजमध्ये अनेक शिक्षक आणि प्रशासकीय विभागात अधिकारी, कर्मचारी खूप वर्षांपासून काम करतात. कॉलेजमधील शेकडो विद्यार्थ्यांनी भरलेले लाखो रुपये प्रशासकीय विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून लांबविले आहेत. मागील आठ-दहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. विद्यार्थ्यांनी भरलेली लाखो रुपयांची फी कॉलेजच्या बँक खात्यात जमा झाली नाही. त्यानंतर चौकशी सुरू केल्यावर फी जमा करून घेणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी हा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र , अपहार केलेली रक्कम ही डोनेशन स्वरूपात घेतलेली रक्कम आहे. त्यामुळे ही रक्कम बेकायदेशीर व काळा पैसा असल्याचे बोलले जाते. त्यामुळे पोलिसात तक्रार तरी कशी करणार अशी चर्चा रंगली आहे. 

लाखो रुपयांचा अपहार करणारे दोन्ही कर्मचारी फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. मागील महिनाभरापासून प्रशासनाने दोन्ही कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला वेळोवेळी बोलावून घेत त्यांना अपहार केलेले पैसे जमा करण्यासाठी तगादा लावला आहे. अन्यथा पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली आहे. 


कोट्यवधी रुपयांचा अपहार ?

शेकडो विद्यार्थ्यांनी भरलेली लाखो रुपयांची फी घेऊन दोन कर्मचारी फरार झाले आहेत. अपहाराची रक्कम जास्त नसल्याचा दावा विश्वस्त करत असले तरी ती रक्कम कोटींच्या घरात असल्याची चर्चा आहे. ही रक्कम विद्यार्थांकडून घेतलेले डोनेशन आहे. हा काळा पैसा अन् बेकायदा असण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून अजूनही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. 

पगार व्हाउचरवर

गेनबा मोझे शिक्षण संस्थेत गेली अनेक वर्ष शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतनापेक्षा कमी रक्कम दिली जाते. अनेकांचे बॅंकेचे पुस्तक संस्था ठेऊन घेते. त्यांना व्हाउचरवर पगार दिला जात असल्याच्या सुरस कथा बाहेर येत आहेत. कधी तरी कायम होऊ, या आशेवर कोणीही तक्रार करीत नाहीत.

काॅलेजमधील दोन कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी भरलेल्या शैक्षणिक शुल्काची रक्कम बँकेत जमा केली नाही. मागील आठ दहा महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. महिनाभरापूर्वी दोन कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. नजरचुकीने कृत्य झाले आहे. कर्मचारी फरार झाले असून कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे."