सांगली समाचार - दि ६ एप्रिल
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असली तरी, सर्वात गोची झाली आहे ती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आतापर्यंत नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात विद्यमान तीन खासदारांची तिकिटेच कापली आहेत. मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देणाऱ्या भाजपाने आता कठोर भूमिका घेतली असल्याचे यावरून स्पष्ट होते.
शिवसेनेच्या 39 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी आपलेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार खाली खेचले. त्यानंतर भाजपाला सोबत घेत, सरकार स्थापन केले. याच्या मोबदल्यात भाजपाने त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. तशी कबुलीही भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. जुलै 2022मध्ये प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीची बैठक पनवेलमध्ये झाली होती. अक्षरश: मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.
विशेष म्हणजे, विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मे 2023मध्ये शिंदे गट कसा दुय्यम आहे, अशाच प्रकारची भावना व्यक्त केली होती. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडे पन्नासच नेते असल्याने विधानसभेत तेवढ्याच जागा सोडल्या जातील, असे वक्तव्य केले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाने हा मनावरील दगड दूर केल्याचे भासते. कारण सद्यस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेचे 13 खासदार असताना आतापर्यंत केवळ 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातही विद्यमान दोन खासदारांची तिकिटे कापण्यात आली. त्यात यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी आणि रामटेकचे कृपाल तुमाने यांचा समावेश आहे. तिथे अनुक्रमे राजश्री पाटील आणि राजू पारवे यांना शिवसेनेने उमेदावरी दिली आहे.
तर, हिंगोलीत विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी आधी जाहीर करण्यात आली होती. पण भाजपा आमदार तानाजी मुटकुळे तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हेमंत पाटील यांचे तिकीट कापून बाबूराव कोहळीकर यांना उमेदवारी दिली. तर, यवतमाळ-वाशिममधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना तिकीट देऊन हेमंत पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला आहे. याच्याव्यतिरिक्त उर्वरित चार खासदारांचे भवितव्य काय आहे, हे गुलदस्त्यातच आहे.
गेल्यावर्षी जूनमध्ये 'राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे' या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपा नेते नाराज झाले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमानिमित्त पालघर येथे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी, आमच्यात फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. तो कदापि तुटणार नाही, असे म्हटले होते. पण लोकसभेच्या जागावाटपावरून शिंदे गटाचा जोड भाजपासमोर डळमळीत झाल्याचे चित्र आहे.