Sangli Samachar

The Janshakti News

कुपवाडमध्ये गुटखा कारखान्यावर धाड, २० लाखाचा माल जप्त, ७ जण ताब्यात



| सांगली समाचार वृत्त |
सांगली, दि.१४ एप्रिल २०२४ - कुपवाड जवळील बामणोलीमध्ये सुरु असलेल्या गुटखा कारखान्यावर पोलिसांनी शनिवारी धाड टाकून सुगंधी तंबाखू, सुपारी, यंत्र असा २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. कारखान्यात काम करत असलेल्या परप्रांतीय ७ जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये दोन मुलांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन अवैध धंदे करणाऱ्या इसमांची माहिती घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

दत्तनगर, बामनोली येथे पत्र्याचे शेडमध्ये गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखु व सुपारी पॅकेजिंग करीत असलेबाबत खात्रीशीर बातमी मिळाली. या माहितीच्या आधारे दत्तनगर बामनोली परिसरात एक शेडमध्ये गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखु व सुपारी पॅकेजिंग करीत असल्याचा संशय आल्याने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पत्र्याचे शेडवर छापा टाकला असता, सदर ठिकाणी सुगंधी तंबाखु व गुटखा तयार करणासाठी लागणारा कच्चा माल व मशीनरी मिळून आल्या. यामध्ये १२,७६,८०० रु. किंमतीची ३१.९२ किलो सुगंधी तंबाखू, ३ लाखाच्या ३ मटेरियल पॅकिंग मशीन, १ लाख ८० हजाराची ४५ किलो वजनाची सुट्टी गुटखा सुपारी, २४ हजाराची २४ किलो सुट्टी सुंगधी तंबाखु, ८३ हजाराचा माणिकचंद गुटखा, ६० हजाराचे पॅकिंग पेपर बंडल, ५२ हजार ६०० रुपयांची पॅकिंगच्या बॉक्सची १६ पोती असा १९ लाख ७६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


शेडवर काम करणाऱ्या ७ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सर्वजण सिकंदरा आग्रा, उत्तरप्रदेशमधील आहेत. त्यांची नावे योगेदंर रामब्रिज सिंह (वय ३० वर्षे), द्रुक गंगा सिंह, (वय २४ वर्षे), मोनु रामबहादुर सिंह (वय ३० वर्षे), हरीओम पुन्ना सिंह, देव बमर सिंह (वय २२ वर्षे) आणि २ बालअपचारी आहेत.

सदर कारखान्यात गुटख्यासाठी लागणारी सुगंधी तंबाखु व सुपारी पॅकेजिंग करीत असून सदरचा कारखाना हा शहाणवाज पठाण (रा. अहिल्यानगर, कुपवाड) हा चालवित असल्याची कामगारानी कबूली दिली. याबाबत एम. आय. डी. सी.कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.