Sangli Samachar

The Janshakti News

सांगली आमचीच, उद्यापासून ठाण मांडून बसणार - संजय राऊता



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
मुंबई - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर काँग्रेसकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होऊन सांगलीचा उमेदवार बदला अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती. अशातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत सांगली आमचीच असे स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीची काल बैठक झाली. अजूनही काही जागांवर तिढा आहे, तर सांगलीच्या जागेवरही चर्चा सुरू आहे. या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, मला असं वाटत नाही की, एखाद्या मतदारसंघावर अजून चर्चा सुरू आहे. काल आम्ही शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि मी स्वत: एका बैठकीला उपस्थित होतो. पण प्रत्येक बैठकीत जागावाटपावर चर्चा होते, असं सांगणं चुकीचं आहे. तुमच्यापर्यंत ज्या बातम्या येत आहेत, सांगलीवर चर्चा झाली का? भिवंडीबाबत चर्चा झाली का? असा तुम्ही प्रश्न करत आहात, पण त्यात फारसं तथ्य नाही. भिवंडीच्या जागेबाबतचा जो निर्णय आहे, तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला आहे. माझ्या माहितीप्रमाणे भिवंडी राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.


सांगलीच्या जागेबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आपण जर सांगलीविषयी विचारत असाल तर सांगलीमध्ये स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे तिथे एखादी वेगळी भूमिका घेऊन उमेदवार मागे घेतला जाईल ही शक्यता अजिबात नाही. काल यासंदर्भात चर्चा झाली आणि मार्ग निघालेला आहे. या निर्णयाबाबत आम्ही दिल्लीत काँग्रेस हायकमांडशी चर्चाही केली आहे. उमेदवारी मागे घेतला जाणार नाही. आम्ही समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर यांची नेमणूक केली आहे. मी आणि शिवसेनेची मुंबईची टीम उद्या सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे. पुढील तीन ते चार मी पूर्ण सांगलीच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, पण महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे.