Sangli Samachar

The Janshakti News

''हातकणंगलेत 'मशाल' दिलीय, मग सांगलीत हट्ट कशासाठी ?'' कदमांनी ठाकरेंना डिवचले



सांगली समाचार - दि ४ एप्रिल २०२४
सांगली सांगलीचा तिढा अजूनही सुटलेला नाही. उद्धव ठाकरेंनी सांगली आपल्याकडेच असणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर विश्‍वजित कदमदेखील मागे हटण्यास तयार नाहीत. सांगलीवर काँग्रेसचा दावा कायम असल्याचे ते सांगत आहेत. आता हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाने उमेदवार दिल्याने सांगलीवरील दावा ठाकरे गटाने सोडायला हवा, असा अप्रत्यक्ष सल्लाच विश्‍वजित कदम यांनी दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला  एक जागा हवी होती. त्यासाठी ते सांगली मागत होते. सत्यजित पाटील यांना त्यांनी हातकणंगलेमधून उमेदवारी दिली आहे. आता तिथे 'मशाल' चिन्ह आले आहे. मग सांगलीचा हट्ट कशासाठी, असा सवाल विश्‍वजित कदम यांनी केला आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडल्याने सांगलीची जागा आम्हाला मिळाली, असा दावा संजय राऊत  यांनी केला होता. तो दावादेखील कदम यांनी खोडून काढला. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली या विषयाला लॉजिक नाही. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली देणार, असे काही ठरले नव्हते, असे विश्‍वजित कदम यांनी ठासून सांगितले.


कोल्हापूरच्या जागेबाबत छत्रपती शाहू महाराजांचे नाव चर्चेला आले. शाहू महाराजांची प्रतिमा चांगली आहे. त्यांच्याबद्दल समाज मनात खूप आदराचे स्थान आहे. ते जो पक्ष निवडतील त्याचा सन्मान ठेवावा, असे ठरले होते. त्यानुसार त्यांनी काँग्रेस निवडला. कोल्हापूर पुरोगामी जिल्हा आहे, म्हणून त्यांनी तसा विचार केला. ती जागा काँग्रेसला गेली. त्यावेळी कुठेही आदलाबदलाची चर्चा झाली नव्हती, असेदेखील विश्‍वजित कदम म्हटले आहे.