Sangli Samachar

The Janshakti News

'माविआ'च्या मोठ्या भावाचं ठरलं, धाकट्याला अडलं !



सांगली समाचार - दि. १० एप्रिल २०२४
मुंबई - महाराष्ट्रामध्ये यंदा लोकसभा निवडणुकांची चुरस वाढणार आहे. भिन्न विचारसरणीच्या युती व आघाड्या, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, सत्ताबदल अशा वादळी घडामोडी घडल्यानंतर राज्यात प्रथमच मोठी निवडणूक होत आहे. अशावेळी मतदारराजा आपले वजन कोणाच्या पारड्यात टाकतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.

काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी विरुद्ध भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही लढत होणार आहे. गत पंचवार्षिक निवडणुकांमध्ये मतांच्या आकडेवारीतून आपले अस्तित्व ठळकपणे दाखवलेली वंचित बहुजन आघाडी देखील निवडणुकांच्या रिंगणात आहे.

अशातच आज, महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा पेच सुटला आहे. महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला या आघाडीमध्ये मोठ्या भावाचा मान मिळाला असून सर्वाधिक २१ जागा त्यांच्या पारड्यात पडल्या आहेत. काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादीला १० जागा मिळाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांचे वाट्याला आलेल्या २१ जागांवर उमेदवार देखील फायनल झाले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मात्र अद्याप ७ जागांवर उमेदवार फायनल करू शकलेली नाही. 


काँग्रेसच्या ४ जागांवरील उमेदवार ठरेना

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला एकूण १७ जागा आल्या आहेत. यापैकी पक्षातर्फे १३ जागांवर उमेदवार निश्चित करण्यात आला आहे तर धुळे, जालना, मुंबई-उत्तर, मुंबई उत्तर मध्य या चार जागांवर अद्यापही चर्चा सुरु आहे.

धुळे – येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. धुळ्यातून भाजपने सलग तिसऱ्यांदा डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसतर्फे अद्याप उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. येथून आमदार कुणाल पाटील यांच्या पत्नी अश्विनी पाटील यांच्या नावाची चर्चा होती. परंतु, त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती आहे. सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, धुळ्याचे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर, नाशिकचे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांची इच्छुक म्हणून नावे घेतली जात आहेत.

जालना – अपेक्षेप्रमाणे जालन्यातून भाजपतर्फे रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दानवे यांनी येथून सलग पाच वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला असून त्यांची विजयी घौडदौड थांबवण्यासाठी कोणाला मैदानात उतरवायचे याची चाचपणी काँग्रेसतर्फे सुरु आहे. येथून कल्याण काळे यांच्या नावाची चर्चा आहे.

मुंबई-उत्तर – २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा भाजपच्या गोपाळ शेट्टींनी येथून चार लाख मतांनी पराभव केला होता. यंदा भाजपने येथून खांदे पालट केली असून केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना मैदानात उतरवले आहे. जागावाटपात हा मतदारसंघ काँग्रेसला मिळाला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास संजय निरुपम इच्छूक होते, पण त्यांची हाकलपट्टी कऱण्यात आली आहे. मुंबई-उत्तर मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चाचपणी सुरु आहे. 

मुंबई उत्तर मध्य – या जागेसाठी काँग्रेसतर्फे नसीम खान, राज बब्बर आणि स्वरा भास्कर यांची नावं चर्चेत आहेत. काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार, हे पुढील काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. दुसरीकडे महायुतीकडूनही या जागेवर अद्याप उमेदवार जाहीर कऱण्यात आला नाही. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये या जागेवर तिढा आहे

राष्ट्रवादी काँग्रेस या तीन जागांवर उमेदवाराच्या शोधात

माढा – माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर पुन्हा एकदा कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार आहेत. तर ‘मविआ’मध्ये ही जागा शरद पवार यांना मिळाली आहे. पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे, भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

मोहिते पाटील उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज आहेत, ते लवकरच शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारतील अशी चर्चा आहे. मोहिते पाटील हे शरद पवार यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी असून घरवापसी झाल्यास त्यांना उमेदवारी मिळू शकते.

मोहिते पाटील यांच्याशिवाय अनिकेत देशमुख आणि अभयसिंह जगताप यांची नावेही चर्चेत आहेत.

सातारा – विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला, त्यामुळे शरद पवार यांच्याकडून साताऱ्यात उमेदराची चाचपणी सुरु आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, साताऱ्यासाठी शरद पवार यांच्याकडून शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. काही दिवसांत त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते.

रावेर – एकनाथ खडसे यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्याकडून खडसेंना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरु होत्या. पण खडसेंनी नकार दिला. त्यामुळे शरद पवारांकडून इच्छूक उमेदवारांची चाचपणी कऱण्यात येत आहे. रवींद्र पाटील आणि श्रीराम पाटील यांची नावं आघाडीवर आहे.