Sangli Samachar

The Janshakti News

पृथ्वीवर पडणारी सूर्याची किरणे होणार परावर्तीत? वाढत्या उष्णेतेपासून मिळणार दिलासा?



सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
वॉशिंग्टन - दरवर्षी तापमानाचा नवा रेकॉर्ड पहायला मिळतो. 2023 पृथ्वीवरील सर्वात तप्त वर्ष होतं. या वर्षी आता कुठे कडक उन्हाळा सुरू झाला आहे, आताची परिस्थिती पाहता तापमानाचा नवा रेकॉर्ड यावर्षीही पहायला मिळण्याची शक्यता आहे. याचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञ वेगवगेळे प्रयोग करत आहेत. मंगळवारी अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी अशाच एका मशीनची पहिली चाचणी घेतली केली. ढगांची संरचना बदलून सूर्याची परावर्तीत केली जातील आणि पृथ्वीवरील तापमान कमी करण्यास मतत होणार आहे. याला क्लाउड ब्राइटनिंग म्हणतात.

कोस्टल ॲटमॉस्फेरिक एरोसोल रिसर्च अँड एंगेजमेंट नावाच्या प्रकल्पांतर्गत ही चाचणी 2 एप्रिल रोजी करण्यात आली. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सॅन फ्रान्सिस्को खाडीतील जहाजावर असताना एका उपकरणातून समुद्रातील मीठाचे शेकडो कण खुले सोडले होते. या मशिनची संरचना बर्फ सोडणाऱ्या एका यंत्रासारखे होते. सागरी ढगांची घनता वाढवणे आणि त्यांची परावर्तीत करण्याची क्षमता आणखी सुधारणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.


क्लाउड ब्राइटनिंग सौरऊर्जा परत अवकाशात पाठवण्याच्या अनेक मार्गांपैकी एक आहे. या प्रकारच्या तंत्रज्ञानाला सोलर रेडिएशन मोडिफिकेशन, सोलर जियोइंजीनियरिंग आणि क्लाइमेट इंटरवेंशन असंही म्हणतात. ढगांच्या माध्यमातून पृथ्वीचे तापमान बदलण्याचा विचार अनेक दिवसांपासून सुरू आहे. जॉन लॅथम या ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञाने 1990 मध्ये नेचर जर्नलमध्ये याचा प्रथम उल्लेख केला होता. ढगांमध्ये लहान कण टाकून वाढत्या तापमानाचा समतोल साधता येतो, असं निरीक्षण त्यांनी मांडलं होतं.

जर 1,000 जहाजं समुद्राच्या पाण्याचे लहान थेंब सतत जगभरातील महासागरांमध्ये हवेत फवारत असतील तर पृथ्वीच्या दिशेने येणारी सौरऊर्जा रिफ्लेक्ट केली जाऊ शकते. यामागील कल्पना अशी होती की लहान थेंबांची घनता सूर्यकिरणांना परावर्तीत करण्यासाठी अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे मोठ्या संख्येने एरोसोल इंजेक्ट केली तर ढगांची संरचना बदलू शकते, असं निरीक्षण मांडण्यात आलं.

डॉ. लॅथम यांनी बीबीसीला सांगितले की, 'जर रीफ्लेक्टिविटी 3 टक्क्यांनी वाढवता आली तर त्यातून निर्माण झालेल्या थंड वातावरणामुळे ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रित ठेवता येईल, असं समतोल साधता येईल. मात्र ग्लोबल वॉर्मिंगवरील समस्येवरचं हे समाधान नाही, त्यासाठी मानवाला अधिक प्रयत्न करावे लागतील, असं डॉ. लैथम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

क्लाउड ब्राइटनिंग ही एक जटिल प्रक्रिया आहे. यामध्ये यशस्वी होण्यासाठी एरोसोलचा आकार योग्य असणं आवश्यक आहे. या प्रकल्पावर काम करणाऱ्या संशोधन शास्त्रज्ञ जेसिका मेड्राडो यांनी न्यूयॉर्क टाइम्सला या प्रयोगाची माहिती दिली. 'जर कण फारच लहान असतील तर त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही. जर खूप मोठे एरोसोलचे कण आकाशात सोडले तर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.'यामुळे ढग पूर्वीपेक्षा कमी परावर्तीत होतील. संशोधन शास्त्रज्ञ म्हणाले की एरोसोलचा आकार मानवी केसांच्या जाडीच्या 1/700 वा हिस्सा असावा. योग्य आकाराव्यतिरिक् दर सेकंदाला हवेत भरपूर एरोसोल कण सोडले जावेत, हे ही महत्त्वाचं आहे.

हवामान बदलाचे धोके कमी करण्यासाठी क्लाउड ब्राइटनिंग हा एक चांगला पर्याय आहे. मात्र, त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही, तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. यामुळेच अमेरिकन सरकारने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या चाचणीपासून स्वतःला दूर ठेवलं आहे. व्हाईट हाऊसने म्हटलं आहे की, 'कुठेही होत असलेल्या सोलर रेडिएशन मॉडिफिकेशन (एसआरएम) प्रयोगांमध्ये अमेरिकन सरकारचा सहभाग नाही.'

ग्रीनपीस इंटरनॅशनलचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डेव्हिड सँटिलो यांनी न्यूयॉर्क टाईम्सने उद्धृत केलेल्या क्लाउड ब्राइटनिंगबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जर क्लाउड ब्राइटनिंगचा वापर ग्रहाला थंड करू शकेल अशा प्रमाणात केला गेला तर त्याचे परिणाम सांगणे किंवा मोजणे कठीण होतील.'यामुळे केवळ समुद्रच नाही तर जमिनीच्या हवामानावरही परिणाम होईल'. काही तज्ज्ञांनी, क्लाउड ब्राइटनिंगला धोकादाक डिस्ट्रैक्शन म्हटलं आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी फॉसिल फ्यूल म्हणजे पेट्रोल, डिझेलचा वापर कमी केला पाहिजे.