Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतून २१९ देशांमध्ये पोस्टामार्फत पार्सल पाठविण्याची सोयसांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
सांगली  - कोणतेही पार्सल सांगलीमधून जगाच्या कानाकोपऱ्यात सहज व माफक किमतीत पाठविण्याची सोय आता पोस्टामार्फत उपलब्ध झाली आहे. निर्यात उद्योगात असलेल्या उद्योजकांनाही हा एक चांगला पर्याय पोस्टाने या माध्यमातून उपलब्ध केला आहे. शिक्षण, उद्योग, व्यावसायाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय संबंध वृद्धींगत झाले आहेत. जिल्ह्यातील बरिचशी मुले शिक्षण व नोकरीसाठी परदेशात असून त्यामुळे परदेशी पाठवल्या जाणाऱ्या पार्सलची वाढती संख्या वाढत आहे. ही गोष्ट लक्षात घेत ग्राहकांच्या सोयीसाठी पोस्टाने सांगलीत विशेष काऊंटर सुरू केले आहे. यामुळे पोस्ट आता कुटुंब व परदेशातील त्यांच्या नातेवाईकांसाठी सेतूचे काम करणार आहे.

सांगलीत मुख्य पोस्ट कार्यालयात विशेष आंतरराष्ट्रीय पार्सल बुकिंग काऊंटरचे उदघाटन गोवा परिक्षेत्राचे डाक सेवा निर्देशक रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डाक घर निर्यात केंद्राचा लाभ जिल्हयातील उद्योजकांनी घ्यावा व आपल्या वस्तू थेट अंतराष्ट्रीय बाजारपेठेतील ग्राहकापर्यंत पोहोचवून आपला उद्योग व्यापक लोकल ते ग्लोबल करावा. पार्सल काऊंटरचा लाभही ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन रमेश पाटील यांनी यावेळी केले.


यावेळी प्रवर अधीक्षक गुरुदास मोंडे, मिरज रेल मेल विभागाचे अधीक्षक संजय देसाई, प्रवर डाकपाल श्रीमती वैशाली कापसे, सहाय्यक अधीक्षक निरंजन ग्रामोपाध्ये, अनिल साळुंखे आदी उपस्थित होते.

निर्यातदारांसाठी स्वतंत्र केंद्र

जिल्ह्यातील व्यावसायिक निर्यातदारांसाठी सांगली व मिरजेतील मुख्य पोस्ट कार्यालयात डाक घर निर्यात केंद्र सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील निर्यातदार आपल्या वस्तू परदेशात पाठवत आहेत. हे केंद्र अंतर्गत निर्यातदारांना ऑनलाइन बुकिंग, ऑनलाइन कस्टम क्लिअरन्स व डिजिटल डॉक्युमेंटेशन या सुविधा उपलब्ध करून देत आहे.

२१९ देशांमध्ये पार्सल पाठविण्याची सोय

जगभरातील जवळपास २१९ देशात वाजवी दरात पार्सल पाठवण्याची सुविधा डाक विभागामार्फत उपलब्ध आहे. परदेशात शिक्षण व नोकरीनिमित्त राहणारे अने सांगलीकरांना दरवर्षी खासगी कुरिअर कंपन्यांमार्फत पार्सल पाठविले जातात. आता पोस्टाने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.