Sangli Samachar

The Janshakti News

रुग्णांसाठी रक्ताचा शोध घेणे होणार सोपे



सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२३
मुंबई - रुग्णांना रक्ताची ज्यावेळी आवश्यकता असेल, त्यावेळी त्यांना तातडीने रक्त उपलब्ध होत नाही.  त्याचबरोबर रुग्णाचा रक्तगट  कोणता आहे, त्यावरही रुग्णाला कोणत्या रक्तगटाची गरज आहे हे ठरवले जाते. अनेकदा दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णांना तातडीने रक्तच मिळत नाही. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. रक्त न मिळाल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली असल्याची अनेक उदाहरणे आहेत.

रक्त उपलब्ध असूनही ते दिले जात नसल्याच्याही तक्रारी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केल्या जातात. त्यावर आता शासनाने ई-रक्तकोष हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे एकाच क्लिकवर रुग्णांना त्यांच्या जवळच्या रक्तपेढीची, त्यातील रक्ताची उपलब्धता याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय होणार आहे.


राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना रक्त संकलनाची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश जारी केले आहेत. रक्त दात्यांच्या नोंदणीच्या सुविधेसोबतच, पोर्टलमध्ये रक्तपेढ्यांमधील रक्ताची आवक व जावक याची ऑनलाइन माहिती जमा करण्यात येणार आहे. तशा सूचना राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार आता कोणत्या रक्तपेढीत कोणत्या रक्तगटाचे रक्त उपलब्ध आहे याची माहिती मिळून रुग्णांना रक्ताची ज्यावेळी आवश्यकता असेल त्या वेळी त्यांना तातडीने जवळच्या रक्तपेढीची, त्यातील रक्ताची उपलब्धता याची माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

रक्तपेढ्यांवर कारवाईचा बडगा

राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना रक्त संकलनाची माहिती अद्ययावत करून ती ई-रक्त कोष या संकेतस्थळावर दररोज अपडेट करण्याची सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता सर्व रक्त पेढ्यांना दररोज सकाळी दहा वाजेपर्यंत अपडेट माहिती भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या रक्तपेढ्यांची दररोजची अपडेट माहिती भरली जाणार नाही त्यांच्यावर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून दिले जाणारी एनओसी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याने रक्तपेढ्याही अलर्ट झाल्या आहेत.

ई-रक्त कोषामुळे होणारे फायदे

रक्त असूनही शिल्लक नसल्याचे सांगणे होणार बंद

गरजेवेळी रक्ताची माहिती मिळणार तत्काळ

सर्व रक्त पेढ्यांना दररोज माहिती अपडेट करण्याचे बंधन

जवळच्या रक्तपेढीचीही माहिती उपलब्ध होणार

रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचाही डाटा होणार संकलित

रक्तपेढीत उपलब्ध असलेले रक्त ३५ दिवसांत वापरण्याचे बंधन

रक्तपेढीतील रक्ताची माहिती ऑनलाइन न भरल्यास होणार कारवाई

सर्व रक्तपेढ्यांतील रक्त संकलनाची माहिती एकत्र होण्यासाठी शासनाने ई-रक्तकोष ही प्रणाली विकसित केली आहे. त्यामध्ये रुग्णाला जर रक्ताची आवश्यकता असेल, तर कोणत्या रक्तगटाची किती रक्त जवळच्या पेढीत उपलब्ध आहे त्याची माहिती या प्रणालीद्वारे मिळेल. त्याचबरोबर रक्तदान करायचे असेल तरीही जवळची ब्लडबॅंक कोणती आहे ही माहितीही याद्वारे मिळेल.