Sangli Samachar

The Janshakti News

: "कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे?" मोदींच्या समोरच उदयनराजे भोसलेंचा थेट सवाल| सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि.२९ एप्रिल २०२४
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. यावेळी भाजपाची अनेक नेतेमंडळी तिथे उपस्थित होती. उदयनराजे भोसलेंना साताऱ्यातून बऱ्याच चर्चांनंतर भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पुन्हा मिळवण्यासाठी उदयनराजे भोसलेंनी जोर लावला असून कराडमधील आजच्या सभेत बोलताना त्यांनी विरोधकांवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, विरोधकांकडून संविधान बदलाच्या होणाऱ्या दाव्यांवरही त्यांनी टीकास्र सोडलं.

"छत्रपतींना अभिप्रेत संकल्प मोदींनी वास्तवात उतरवले"

यावेळी उदयनराजे भोसलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळली. "छ्त्रपती शिवाजी महाराजांनी संदेश दिला की राजकारणात लोकांचा सहभाग असायला हवा. त्यातून लोकशाहीचा जन्म झाला. गेल्या १० वर्षांत शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे संकल्प मोदींनी सत्यात उतरवले", असं उदयनराजे भोसले यावेळी म्हणाले.


"विरोधकांच्या महाविकास आघाडीत अजूनही वाद आहेत. महाविकास आघाडी चुकून झालंय. ते महाभकास आघाडी असावं. नियोजनाचं अभाव असणाऱ्या ठिकाणी त्यांची अधोगतीच्या दिशेनं वाटचाल दिसते", असंही उदयनराजे भोसले म्हणाले.


भाजपा संविधान बदलणार ? उदयनराजे म्हणाले…

दरम्यान, विरोधकांकडून भारतीय जनता पक्षावर संविधान बदलण्याचा आरोप केला जातो. त्यावरही उदयनराजे भोसलेंनी हल्लाबोल केला. "विकासकामांच्या बाबतीत बोलता येत नाही तेव्हा विरोधक म्हणतात संविधान बदलणार. कशाला बदलणार संविधान? काय गरज आहे का बदलायची? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या समितीनं उत्कृष्ट संविधान बनवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा विचार करून संविधान बनवण्यात आलं आहे", असं उदयनराजे भोसले म्हणाले.

इंदिरा गांधींवर टीका

"संविधानाचा पूर्णपणे खात्मा करण्याचं, ते खलास करण्याचं काम त्यावेळच्या आदरणीय पंतप्रधान इंदिरा गांधींनी केलं. आणीबाणी लागू केली. का? तर मोठा उठाव व्हायला लागला. जेव्हा देशातले सामान्य माणसं मोठ्या प्रमाणावर न्याय्य हक्कांची मागणी करू लागले, तेव्हा त्यांना वाटायला लागलं की हे मला विरोध करत आहेत", अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली.