yuva MAharashtra शरद बाबूंनी 'भविष्यातील प्लॅन'मुळं महाआघाडीतलं 'वर्तमान' बिघडण्याचा धोका ?

शरद बाबूंनी 'भविष्यातील प्लॅन'मुळं महाआघाडीतलं 'वर्तमान' बिघडण्याचा धोका ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.२१ एप्रिल २०२४
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील राजकारणाचे धुरंदर नेते व भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार कधी काय बोलतील आणि या बोलण्यात त्यांचा रोख कोणाकडे असतो, याचं गणित भल्याभल्यांना सुटलेलं नाही. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहते आहे. प्रत्येकाची आपली काही गणितं आहेत. परंतु या वेळच्या लोकसभेत सर्वात कमी जागा घेऊन शरद पवार यांनी पावले मागे का घेतली ? असाच प्रश्न सर्वांनाच पडला होता. याबाबत बोलताना शरद पवार यांनी 'भविष्याचा प्लॅन' सांगितला, परंतु त्यामुळे महाआघाडीतील 'वर्तमान व भविष्य' बिघडते की काय अशी शंका व्यक्त होते आहे.

लोकसभेला आम्ही जाणीवपूर्वक कमी जागा घेतल्या. महाविकास आघाडीत आम्ही फक्त 10 जागा लढवत आहोत. आमचे लक्ष्य महाराष्ट्राची विधानसभा आहे. विधानसभा निवडणुकाला आम्ही जास्त जागा लढवणार आहोत. प्रचार दौऱ्या दरम्यान शरद पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते. विधानसभेत आमच्या विचाराचे जास्तीत जास्त प्रतिनिधी असतील, असा आमचा प्रयत्न असेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले. 


शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाराष्ट्रात काय भूमिका असेल, यावर भाष्य केले. महाराष्ट्रात गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना 6 जागा मिळाल्या होत्या. यंदा महाविकास आघाडी सर्व जागा लढवत आहे. एक-दोन जागा वगळता सर्व ठिकाणी आमच्यामध्ये एकवाक्यता आहे. त्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात 50 टक्क्यांपेक्षा जास्त यशाची अपेक्षा आहे.

लोकसभेचे हे गणित मांडताना, विधानसभेवेळी आपल्या पक्षाला अधिकाधिक जागा पदरात पडून घ्यायच्या, हे गुपित शरद बाबूंनी उघडे केले आणि त्यामुळे विधानसभेत आपल्या पक्षाला कमी जागा मिळाल्या तर इच्छुक उमेदवारांना कसे थोपवायचे ? असा प्रश्न ठाकरे शिवसेना व काँग्रेस पक्षासह मित्र पक्षांना पडला आहे. सध्या महाआघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस तिन्ही पक्ष अडचणींशी सामना करीत आहेत. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये नाराजी आणि बंडखोरी दिसून येत आहे. अशात शरद पवार यांनी विधानसभेमध्ये जास्त जागा पदरात पाडून घेतल्या, तर आपल्या पक्षाचे व इच्छुकांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला असून, महाआघाडीतील सर्वच पक्षाचे नेते संभ्रमात पडले आहेत.