लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा सुरू आहेत. दरम्यान, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी 'आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून घडवेन अन् दिल्लीला जाईन, असं फडणवीस म्हणाल्याचा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी केला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या गौप्यस्फोटावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज उद्धव ठाकरेंची पोल उघडली, मला असं वाटतं आमचे जुने मित्र उद्धवजी हे थोडे भ्रमिष्ठ झाले आहेत. आज ते असं म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं होते की, आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्री करेन आणि मी दिल्लीमध्ये जाईन, त्यांना वेड लागलं असेल मला तर नाही ?, असा टोला फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला.
'पण, माझा सवाल आहे, अमित शाहांनी कुठल्यातरी खोलीमध्ये नेऊन त्या ठिकाणी सांगितलं की, तुम्हाला मुख्यमंत्री करतो हा कालपर्यंतचा भ्रम होता. आता आज त्यांचा भ्रम बदलला आहे, आज ते म्हणतात देवेंद्र यांनी सांगितलं होतं की आदित्यला मुख्यमंत्री करतो, उद्धवजी पहिलं हे ठरवा की अमित शहांनी सांगितलं की देवेंद्र यांनी सांगितलं होतं. ठाकरे हे भ्रमिष्ठ झाले आहेत. आता यांना काहीही समजत नाही. एक खोटं लपवायला दुसर खोटं बोलतात. ते सपशेल उघडे पडले आहेत. हो मी सांगितलं होतं की, आदित्य ठाकरेंना लढवा कारण तुमचा पक्ष त्यांना सांभाळायचा आहे. काहीतरी ट्रेनिंग मिळालं पाहिजे. पण, त्या ठिकाणी मुख्यमंत्री सोडा, मंत्री बनवण्याचाही विचार माझा नव्हता, असा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरेंनी जर आदित्यला मंत्री बनवलं नसतं तर त्यांच्या पक्षाची अशी हालत झाली नसती. पण, यातून एक गोष्ट निश्चित झाली एकतर मी मुख्यमंत्री नाहीतर माझा मुलगा मुख्यमंत्री. म्हणजे केवळ आपल्या परिवाराचाच विचार असल्याचे स्पष्ट झालं, असा आरोपही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.