Sangli Samachar

The Janshakti News

सयाजी शिंदे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया; अचानक छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात दाखल




सांगली समाचार - दि. १३ एप्रिल २०२४
सातारा - लोकप्रिय मराठी आणि दाक्षिणात्त्य सुपरस्टार अभिनेते सयाजी शिंदे यांच्या अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, काल रात्री अचानक त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना ताबडतोब रूग्णालयात नेले. त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्यात आली आङे. प्रकृती गंभीर असल्याने ही शस्त्रक्रिया करण्यात आली. 

आता त्यांचा प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी माध्यमांना दिल्याचे कळते आहे. सयाजी शिंदे यांनी मराठी, हिंदी तसेच अनेक दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीत अनेक लोकप्रिय भुमिका केल्या आहेत. आपल्या दर्जेदार अभियाने त्यांनी रसिक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीची चाहत्यांना काळजी असून यावेळी ते सातारा येथील खाजगी रूग्णालयात विश्रांती घेत असल्याचे कळते आहे. 


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे असे कळते की, ''काही दिवसांपूर्वी सयाजी शिंदे यांना छातीमध्ये अस्वस्थ वाटत असल्याने ते रूग्णालयातही गेले होते. त्यांनी व्यवस्थितरीत्या तपासणी केली. त्यांची तिथे रुटिन तपासणी करण्यात आली. टू डी इको कार्डिओग्राफी केली तेव्हा त्यांच्या हृदयाचा छोटासा भाग हा थोडासा कमी हालचाल करत असल्याचे दिसून आले. काल त्यांची अँजिओग्राफी केली तेव्हा त्यांच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांपैंकी दोन रक्तवाहिन्या अगदी नॉर्मल होत्या. उजव्या बाजूच्या रक्तवाहिनीच्या मुखापाशी 99 टक्के ब्लॉक आढळला. शरीराकडून त्यांना जे वेगळे संदेश येत होते ते त्यांनी ओळखले आणि त्यांनी वेळीच तपासण्या करून घेतल्या. या तपासण्यांमध्ये जो दोष आला तो आम्ही डॉक्टरांनी दुरुस्त केला''. आता त्यांची प्रकृती अगदी स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

सयाजी शिंदे हे 65 वर्षांचे आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांतून काम केली आहेत. अभिनयासोबतच ते सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. सयाजी शिंदे हे 'वनराई' या त्यांच्या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ओसाड जमिनीवर पुन्हा एकदा झाडं लावण्याचे काम हिरहिरीने करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसते आहे. ते पर्यावरणाबाबतीत नेहमची सजग असतात. अनेकांना ते झाडं लावायला प्रोत्साहित करतात. सयाजी शिंदे नुकतेच नागराज मंजुळे यांच्यासमवेत 'घर बंदूक बिरयाणी' या चित्रपटात दिसले. ते अनेक मनोरंजनसृष्टीच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होतात. त्यांच्या खलनायिकी भुमिकाही प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. 

सयाजी शिंदे यांना कधी डिस्चार्ज मिळेल याबाबतीतही लवकरच माहिती कळेल. यावेळी डॉक्टर म्हणाले की, ''शुटिंगसह सामाजिक उपक्रमांमुळे ते महाराष्ट्रभर फिरत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्यात कायमच उत्साह असतो. कामात ते स्वत:ला झोकून देतात पण याचबरोबर आपल्या शरीरातील बदल त्यांनी ओळखले आणि योग्यवेळी त्यांना योग्य उपचार मिळाल्याने ते आता पुन्हा चांगले काम करू शकतात.''