yuva MAharashtra ठाकरे सेनेचे सांगलीतील अंदाज चुकले काँग्रेस युवा ब्रिगेड शड्डू ठोकून उभे ठाकले

ठाकरे सेनेचे सांगलीतील अंदाज चुकले काँग्रेस युवा ब्रिगेड शड्डू ठोकून उभे ठाकले



सांगली समाचार - दि. ३ एप्रिल २०२४
सांगली - 'कोल्हापूरच्या बदल्यात सांगली' हा नारा देऊन ठाकरे सेना आणि तिच्या पाठीशी असलेल्या अदृश्य शक्तीचे अंदाज चुकले आणि कुस्तीचे अनेक मैदाने गाजवलेल्या पैलवान चंद्रहार पाटलांना राजकारणातील मैदानात संजय पाटलांसह, विशाल पाटलांशीही दोन हात करावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांना मातोश्रीवर पाचारण करून शिवबंधन बांधले व सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीची गदा हाती सोपवली. भाजपातील धुसपूस आणि महाआघाडीची शक्ती आपल्या पाठीशी उभी राहील. असा ठाकरे - राऊत व त्यांच्या पाठीशी असलेल्या आदर्श शक्तीचा अंदाज होता. याचे कारण देशात सध्या काँग्रेस गलितगात्र झालेली आहे. तर राज्यात फारशी वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे आपल्या मागे त्यांना फरपटत येण्याशिवाय पर्याय नाही, ही शक्यता इरेला पेटलेल्या माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ. विक्रम सावंत, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून केली दोन वर्षे मतदार संघात पेरणी केलेल्या विशाल पाटील यांनी चुकीची ठरविली.


ठाकरे- राऊत यांनी तुम्ही सांगलीत भिडणार असाल तर, आम्ही राज्यात तुमच्या विरोधात जाऊ, असा दिलेला इशारा कुचकामी ठरला आहे. सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी राज्यातील व केंद्रातील पक्षश्रेष्ठींना आपली बाजू पटवून दिल्यामुळे तेही या मंडळींच्या पाठीशी ठामपणे उभे असलेले दिसते आहे. परिणामी एक तर ठाकरे सेनेने सांगली वरील हक्क सोडावा किंवा मैत्रीपूर्ण लढतीस तयार व्हावे, अशी भूमिका घेतली आहे.
आज महाआघाडीच्या बैठकीत ठाकरे काय निर्णय घेतात, यावर सांगली जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांनी आपला पुढील डाव टाकण्याचे ठरवले आहे. तत्पूर्वी या साऱ्या घडामोडीत डॉ. विश्वजीत कदम यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे त्यांनी फोडलेला 'लेटर बॉम्ब, सध्या चर्चेचा विषय बनला आहे. ठाकरेनी आपला हट्ट कायम ठेवला तर, राज्यात काँग्रेसला अडचणीत आणण्याऐवजी विशाल पाटील यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरवायचे आणि विजयासाठी पाठीशी ठाम उभे राहायचे अशी रणनिती आखण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण याबाबतचे अंतिम चित्र महाआघाडीच्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.