Sangli Samachar

The Janshakti News

राजकारणात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते... सतीश साखळकर| सांगली समाचार वृत्त |
दि.२३ एप्रिल २०२४
राजकारणात प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते असे म्हटले जाते. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे अखंड देशभरात वाहत आहे त्याच पद्धतीने आपल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा देशभरात गाजताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. महाविकास आघाडीची तिकिटाची लांबलेली प्रक्रिया, विशाल पाटील यांची झालेली बंडखोरी, संजयकाका यांच्या हॅट्रिकची तयारी आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी. तसेच इतर वेळी कुठेही सांगली जिल्ह्यात सक्रिय नसणारे प्रकाश अण्णा शेंडगे यांची उमेदवारी. त्याच पद्धतीने चळवळीत काम करणारे स्वाभिमानीचे उमेदवार महेश खराडे यांनी त्यांच्या कार्यासाठी उमेदवारी ठेवलेली आहे का ? अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांचे चिन्ह गोठवण्यासाठी उमेदवारी ठेवलेली आहे ? असे बरेचसे प्रश्न या निमित्ताने चर्चेत येत आहेत.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्याबाबत कोणाचेही दुमत नाही. मात्र सध्या सर्वच मतदार संघांमध्ये पंधरा-वीस उमेदवार उभे राहिलेले आहेत, असं सर्वसाधारण दिसत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात 650 लहान मोठी गावे वाड्या वस्त्या आहेत. आणि किमान 20 लाखाच्या पुढे मतदार आहेत. या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली यंत्रणा आहे का ? याचा सारासार कुणीही विचार केलेला दिसत नाही. असो,

सांगली जिल्ह्यातील राजकारण हे कोणत्याही पक्षाला धरून नसते, तर ते 'जेवणाच्या ताटातील लोणच्या मप्रमाणे वापरण्याचा प्रकार वारंवार इतिहासापासून दिसून आलेला आहे.' सांगली जिल्ह्यातील राजकारण राजारामबापू गटाचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, वसंतदादा घराण्याचे स्वर्गीय मदन भाऊ पाटील असतील व आत्ताचे विशाल दादा पाटील असतील यांच्या गटाभोवतीच फिरत असतं. आणि सोयीनुसार लोकसभा असेल, विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, या दोन घराण्याच्या भोवतीच फिरत असतं. हा आजवरचा इतिहास आहे.
राजकारणात कोण कोणाला सोप्या पद्धतीने पुढे जाऊन देत नसतं ? मात्र सांगली लोकसभा निवडणुकीत 2019 ला काँग्रेसचे तिकीट का गोठवण्यात आलं ? हे आजपर्यंत सर्वसामान्य मतदाराला कळलेले नाही. 2019 च्या निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऐनवेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारी घेऊन जोरदार निवडणूक लढवली आणि नंतर ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि आमदार झाले. जाणकार राजकारणी लोकांना माहीत होते, गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांना निवडून आणण्यासाठीच होती. मात्र सर्वसामान्य मतदारांना निकालानंतर कळाले इतकेच.
सध्या सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात जागृती झालेली दिसत आहे. काही उमेदवारी संजय काका पाटील यांना सोपी जावी, निवडणूक म्हणून देण्यात आलेली आहे. अथवा भाजप विरोधी मतदान कसे विभागले जाईल, यादृष्टीने व्यूहरचना करण्यात आलेली आहे.

असो, राजकारणात हे सगळं चालायचं. मात्र चालू निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांचे नाव त्यांच्या अल्फाबेट प्रमाणे खालीच येणार होते. मात्र ते कसे अडगळीत जाईल, त्यांनी एका विशिष्ट चिन्हाच्यासाठी अपक्षचा अर्ज प्रथम भरून प्रथम क्लेम लावण्यासाठी केलेली उपाययोजना, षडयंत्राच्या राजकारणामुळे मागे पडलेली दिसत आहे. एखाद्या मतदार संघांमध्ये अथवा एखाद्या उमेदवाराला कशा कशा पद्धतीने अडचणीत आणता येईल, याची पुरेपूर व्यवस्था राजकीय जाणकार करताना दिसत आहेत. हे सुद्धा सर्वसामान्य मतदारांना कळलेले आहे.

आता बंडखोरी झाल्यामुळे काँग्रेसचे नेते आ. डॉ. विश्वजीत कदम असतील, आ. विक्रम सावंत असतील अथवा पृथ्वीराज बाबा पाटील असतील. यांची मात्र कसोटी लागणार आहे कालच दैनिक जनप्रवासचे संपादक भोकरे यांनी 1985 सालचा किस्सा सांगून स्वर्गीय पतंगराव कदम यांना स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी अपक्ष आमदार म्हणून निवडून आणलेला प्रसंग सांगून, विश्वजित कदम साहेबांनी पैरा फेडण्याची वेळ आलेले असं सुचित केला आहे.

पै. चंद्रहार पाटील यांचीसुद्धा या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक असतील, मग ते आमचे बजरंग भाऊ पाटील असतील, शंभूराज काटकर असतील, आपल्या नेत्यावरील व पक्षावरील निष्ठा अबाधित ठेवून प्रामाणिकपणाने पक्ष आदेश म्हणून काम करताना दिसत आहेत. त्यांना कितपत यश येईल ते येणारा काळ ठरवेल.

- सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.