yuva MAharashtra 'मॅच सुरू होण्यापूर्वीच दोन प्लेअरला अटक, नरेंद्र मोदींचा मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न' : राहुल गांधी

'मॅच सुरू होण्यापूर्वीच दोन प्लेअरला अटक, नरेंद्र मोदींचा मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न' : राहुल गांधी



सांगली समाचार - दि.  १ एप्रिल २०२४
नवी दिल्ली -  राजधानी दिल्लीत सर्व विरोधक एकवटले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात रामलीला मैदानात रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीला लोकशाही बचाव रॅली नाव देण्यात आले आहे. या रॅलीत शरद पवार, राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांच्यासह देशभरातील विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. या रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

मॅच सुरू होण्यापूर्वी आमच्या दोन प्लेअरला अटक

राहुल गांधी म्हणाले, सध्या आयपीएलच्या मॅचेस सुरू आहेत. मॅच फिक्सिंग शब्द तुम्ही ऐकला आहे का? जेव्हा अंपायरवर दबाव टाकून, प्लेअरला खरेदी करुन, कॅप्टनला घाबरवून मॅच जिंकली जाते... क्रिकेटमध्ये त्याला मॅच फिक्सिंग म्हटले जाते. आपल्यासमोर आता लोकसभा निवडणूक आहे. अंपायर कुणी निवडला तर नरेंद्र मोदींनी... मॅच सुरू होण्यापूर्वी आमच्या दोन प्लेअरला अटक केली. मग ही निवडणूक होत आहे... या निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ज्या दिवशी संविधान संपेल त्या दिवशी देशाचा अंत होईल - राहुल गांधी

ही मॅच फिक्सिंग का होत आहे तर त्यांचं केवळ एकच लक्ष आहे... भारताचं संविधान गरीब जनतेच्या हातातून हिसकावण्यासाठी ही मॅच फिक्सिंग सुरू आहे. ज्या दिवशी हे संविधान संपेल त्या दिवशी हा हिंदुस्तान राहणार नाही. हे संविधान भारतीयांचा आवाज आहे. ज्या दिवशी हे संविधान बदलाल तेव्हा हिंदुस्तान राहणार नाही. धमकावून, घाबरवून, पोलीस, सीबीआय, ईडीसह आणि मीडियाच्या शिवाय देश चालवता येईल असे यांना वाटत आहे. तुम्ही मीडियाला खरेदी करु शकता, त्यांच्यावर दबाव आणू शकता पण हिंदुस्तानच्या जनतेचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही असं राहुल गांधी म्हणाले.


... तर यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल

नोटबंदीमुळे कोणत्या तरुणाला, शेतकऱ्यांना, गरीबाला, छोट्या व्यापाऱ्यांना फायदा झाला मला सांगा... सर्वाधिक बेरोजगारी हिंदुस्तानात आज आहे. 1 टक्के लोकांकडे भारतातील सर्वाधिक पैसा आहे. हे संविधान का बदलू इच्छित आहेत... कारण, यांना तुमच्याकडून तुमचे पैसे हिसकावून घ्यायचे आहेत. जर तुम्ही मतदान केलं नाही तर यांची मॅच फिक्सिंग यशस्वी होईल. ज्या दिवशी मॅच फिक्सिंग यशस्वी होईल त्या दिवशी आपल्या संविधानाचा अंत होईल असंही राहुल गांधी म्हणाले.

विरोधी पक्षांनी निवडणूक लढू नये अशी भाजपची इच्छा

ही लोकसभा निवडणूक सामान्य नाहीये. ही निवडणूक संविधानाच्या संरक्षणासाठी, गरिबांचे हक्क, शेतकऱ्यांचे हक्क, दलित-आदिवासींचे हक्क वाचवण्याची ही निवडणूक आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण या निवडणुकीत मॅच फिक्सिंग सुरू आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. आमची बँक अकाऊंट्स गोठवली गेली. कारण विरोधी पक्ष निवडणुका लढू शकत नाही असे त्यांना वाटत आहे असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.