Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीत 'मशाल विरुद्ध विशाल'; अपक्ष उमेदवार पाटील यांनी फुंकलं रणशिंग !| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२३ एप्रिल २०२४
महाविकास आघाडीने शिवसेनेमार्फत याठिकाणी उमेदवार दिला. शेवटपर्यंत प्रयत्न करुनही त्यांनी उमेदवारी मागे घेतली नाही. त्यामुळे अपक्ष म्हणून आम्ही 'लिफाफा' या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार आहे. हा लढा विशाल पाटीलचा नाही. मला एखादं पद पाहिजे म्हणून उभा राहिलेलो नाहीय. माझा काही स्वार्थ असता, तर मिळणारं पद घेऊन मी माघार घेतली असती. हा लढा जनतेचा आहे. मी जनतेचा उमेदवार आहे. मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे. येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वत:ला समजतो. काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा भक्कमपणे माझ्या पाठिशी उभा आहे. म्हणून मी निवडणुकीची उमेदवारी कायम ठेवली आहे. मला उमेदवारी मिळू नये, पक्षाला उमेदवारी मिळू नये, मला चांगलं चिन्ह मिळू नये, अशा अत्यंत खालच्या पातळीवरचं प्रयत्न जी लोक करतात, त्यांना ४ जूनच्या निकालात आमचा लिफाफा उघडून विशाल पाटील यांचा विजय झाल्याची खात्री होईल, असं म्हणत सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकलं.

विशाल पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले, हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे. काँग्रेस पक्षाचं चिन्ह या जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा निर्णय काहींनी घेतला. यामागे कोण आहे, हे काही दिवासांनी समोर येईल. आघाडीतले इतर पक्ष म्हणतात, काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न झाला. सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता लिफाफा चिन्हावर निवडून येणार. काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे. सांगलीचा खासदार सांगलीकर ठरवतील. सांगलीच्या जनतेचा उमेदवार म्हणून मी कोणत्याही अमिषाला बळी पडलो नाही.


या लिफाफ्याच्या माध्यमातून आम्हाला प्रेम द्यावं, आपल्या अडचणी सांगाव्यात आणि लोकसभेत आपला प्रतिनिधी कसा असावा, तो अपक्ष जरी असला, तरी त्याचा आवाज लोकसभेत वाजेल, त्यावेळी सांगलीचा आवाज लोकसभेत आला आहे, ही भावना असेल. कार्यकर्त्यांना मी विनंती करतो, आपण सर्वांनी आता कामाला लागावं. पूर्ण मतदान माझ्या उमेदवारीच्या उक्षे राहील. इतर पक्षातील भरपूर लोक आमच्या पक्षात प्रवेश करणार आहे.

ही निवडणूक दुरंगी आहे. काँग्रेस पक्षाचा बंड केलेला विशाल पाटील विरुद्ध भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात आहे. इतर १८ उमेदवार या स्पर्धेत नाहीत, असंही विशाल पाटील म्हणाले. सांगली लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात जोरदार लढत होणार आहे. आता या राजकीय आखाड्यात कोणता उमेदवार बाजी मारतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.