Sangli Samachar

The Janshakti News

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं 'हे' नाव !सांगली समाचार - दि. ९ एप्रिल २०२४
पुणे - पुणेकर नेहमीच सर्वांना सांगत असतात की, आमचं शहर जगात भारी आहे. आमची तुळशीबाग, आमची मिसळ, आमची मस्तानी वगैरे वगैरे जगात भारी आहे. पुणेकरांना त्यांच्या शहराचा फारच अभिमान आहे. याच शिक्षण आणि संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या पुण्याला जगाच्या नकाशात ओळखही मिळाली आहे. शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य, पेशव्यांनी वसवलेल्या पेठा, लाल महाल यांपेक्षाही अनेक वेगळ्या गोष्टी आज पुण्याची ओळख म्हणून मिरवत आहेत. पुणे शहराला जसा इतिहास आहे, तसाच इतिहास पुणे या नावालाही आहे. तुम्हाला माहितीये का की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबानं पुण्याला काय नाव दिलं होतं आहे ठाऊक ? लेखक सुप्रसाद पुराणिक यांनी 'नावामागे दडलंय काय?' या पुस्तकात याबद्दलची माहिती दिली आहे.

इ.स. ७५८ सालच्या ताम्रपटात पुण्याचा सर्वांत पहिला लिखित उल्लेख मिळतो. त्या ताम्रपटात मुळा नदी, दापोडी, भोसरी, बोपखेल यांचाही उल्लेख आहे. त्यानंतर राष्ट्रकुटांच्याच काळात इ.स. ७६८ च्या ताम्रपटात पुण्याचा अजून एक उल्लेख पूनकविषय, असा केल्याचं दिसतं. त्यानंतर इ.स. ९९३ मधील ताम्रपटात पूणक, असा उल्लेख मिळतो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात पुणे परिसराचे पाच भाग केलेले होते. माळीची जमीन, मुजेरीची जमीन, कुंभारी व कासारी या कारागीरांच्या दोन वस्त्या आणि पुणेवाडीची वस्ती, असे पाच भाग होते. त्यानंतर पुण्याचे कसबे पुणे, असे उल्लेख मिळतात.


औरंगजेबानं पुण्याला दिलं होतं ‘हे’ नाव

राजमाता जिजाऊंनी उद्ध्वस्त झालेलं पुणे पुन्हा वसवलं. कसबा गणपतीची प्रतिष्ठापना केली. मात्र, पुढे शिवरायांच्या मृत्यूनंतर मराठ्यांना हरवून दक्षिण भारत जिंकायचे म्हणून औरंगजेब बादशाह स्वतः महाराष्ट्रात आला. परंतु, औरंगजेब दक्षिणेत आल्यावर मात्र पुण्याचा एका वेगळा उल्लेख मिळतो. मुघल सम्राट औरंगजेबाची दक्षिण जिंकण्याची मोहीम अनेक वर्षे चालली. मराठ्यांच्या कडव्या झुंजीमुळे त्याला अपयशच आले. औरंगजेबाच्या आयुष्याची अखेर इथेच महाराष्ट्रात झाली. दरम्यान, तो १७०२-०३ मध्ये पुण्यात राहिला होता. त्याची छावणी व मुक्काम नागझरी ओढ्यापलीकडील बोरवनात होता, असे म्हटले जाते. तिथे बोरीची झाडे असल्याने त्या जागेस ‘बोरवन’ म्हणत. ही जागा सध्याच्या भवानी पेठेजवळ आहे. इ.स. १७०२-०३ दरम्यान त्याने पुण्याचे नाव बदलले. याचे कारण असे की, त्याचा नातू ‘मुही-उल-मिलत’ हा पुण्यात वारला. त्याची कबर कुंभार वेशीजवळ धाकट्या शेख सल्ल्यानजीक आहे. नातवाच्या स्मरणार्थ औरंगजेबाने पुण्याचे नाव ‘मुहियाबाद’ असे ठेवले होते.

पुढे औरंगजेबाने महियाबाद ही पेठही वसवली. पुण्याचे तत्कालीन उल्लेख महियावाद-पुणे असे सापडतात. धाकट्या शेख सल्ल्याच्या जागेवर पूर्वी पुण्येश्वर मंदिर, तर नव्या पुलाजवळ थोरल्या शेख सल्ल्याच्या जागी नारायणेश्वर हे मंदिर होते. परंतु, कालांतराने पुण्याचे मुहियाबाद नाव फार काळ टिकले नाही.

पुण्यातील प्रसिद्ध 'सारसबाग' कोणी बांधली ?

इंग्रजकालीन पूनाही व्यवहारात फारसे रूढ झाले नाही. पुणे हे पुणेच राहिले. औरंगजेबाने स्वराज्यातील अनेक किल्ल्यांची नावे बदलली. उदा. रायगडचे इस्लामगड, सिंहगडचे बक्षिंदाबक्ष, सज्जनगडचे नवरसतारा व साताऱ्यातील अजिंक्यताऱ्याचे आजमतारा, तोरण्याचे फत्तेहुलगैब. पण, ही नावेही फार काळ टिकली नाहीत.