Sangli Samachar

The Janshakti News

भूकंपात सर्वकाही उद्ध्वस्त, पण सर्वात उंच बिल्डिंग हललीही नाही, कसा झाला चमत्कार



सांगली समाचार - दि ८ एप्रिल २०२४
नवी दिल्ली  - काही दिवसांपूर्वीच तैवान भूकंपानं हादरलं. तब्बल 7.4 रिश्टर स्केल भूकंपाचे तीव्र धक्के बसले. गेल्या 25 वर्षांत देशातील हा सर्वात मोठा भूकंप होता. यात कित्येक इमारती कोसळल्या. भूकंपाने सर्वकाही उद्ध्वस्त केलं. पण सर्वात उंच इमारत मात्र हललीही नाही. या इमारतीचं नुकसान झालं नाही. असं या इमारतीत काय आहे, हा चमत्कार कसा झाला?

तैपेई 101 असं या इमारतीचं नाव आहे. 101 मजल्यांची ही इमारत. एकेकाळी ही जगातील सर्वात उंच बिल्डिंग होती. तैवानमध्ये जिथं भूकंपाचा केंद्रबिंदू होता, त्या ठिकाणापासून 80 मैलावर ही बिल्डिंग आहे. भूकंप आल्यानंतर अंदाजे 770 इमारती कोसळल्या पण ही गगनचुंबी इमारत मात्र तग धरून उभी राहिली. सीएनएनच्या वृत्तानुसार, भूकंपातही उंच उभ्या असलेल्या या इमारतीचं नाविन्यपूर्ण डिझाईन हे तिच्या मजबूतीचं कारण मानलं जातं.

काय आहे या इमारतीत?

या इमारतीत एक मोठा पेंडुलम आहे. जे ट्युन्ड मास डंम्पर म्हणून ओळखलं जातं किंवा याला विंड डॅम्पिंग बॉल असंही म्हणतात. हा पेंडुलम इमारतीत 87 ते 92व्या मजल्यादरम्यान बसवण्यात आला आहे. जे जमिनीपासून हजार फूट उंचीवर आहे. याचं वजन 660 मेट्रिक टन आहे, इतकं ते जड आहे.


कशासाठी असतो हा बॉल?

हा बॉल उंच इमारतींमध्ये बसवला जातो जेणेकरून इमारतीवरील जोरदार वाऱ्याचा प्रभाव कमी करता येईल. त्यामुळे उंच इमारतींमध्ये राहणंही सोपं होतं. अनेक इमारतींमध्ये ते अशा प्रकारे बसवले जातात की ते बाहेरून दिसत नाहीत. पण तैपेई 101 मध्ये बसवलेला डँपर इमारतीवर होणारा परिणाम टाळण्यास सक्षम आहे आणि तिचं सौंदर्य देखील वाढवतो

या बॉलमुळे कशी वाचली इमारत?

हा बॉल भूकंपाचे धक्के शोषून घेण्यास उपयुक्त आहे. आउटलेटनुसार, हा डँपर भूकंप किंवा जोरदार वाऱ्याच्या वेळी इमारतीच्या हालचालींवर प्रतिकार करतो आणि त्यांचा प्रभाव कमी करतो.

तैपेई 101 वेबसाइटनुसार, जेव्हा भूकंप, वादळ किंवा अशी कोणतीही नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा हे वर्तुळाकार डँपर समोरून मागे सरकू लागतं. अशा प्रकारे ते जोरदार वारा किंवा भूकंपाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात शोषून घेतं. या डँपरमुळे इमारतीची हालचाल चाळीस टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा डँपरच्या अभियंत्यांनी केला आहे. त्यामुळे आत राहणाऱ्या लोकांना जास्त त्रास सहन करावा लागत नाही. भूकंपाच्या वेळी तैपेईतील या उंच इमारतीत थोडीशी हालचाल होत नाही, तर जवळची इमारत भूकंपामुळे प्रचंड हादरत असल्याचेही क्लोज सर्किट कॅमेऱ्यात दिसत आहे.