Sangli Samachar

The Janshakti News

भाजपाला साथ दिल्यानंतर अजित पवारांच्या चौकशा का थांबल्या ? अमित शाह म्हणाले...



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२० एप्रिल २०२४
राष्ट्रवादीत फूट पाडून भाजपाबरोबर गेलेल्या अजित पवारांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. असा आरोप केल्याच्या काहीच दिवसांत अजित पवारांनी भाजपाला साथ दिली. त्यामुळे भाजपात गेल्याने अजित पवारांवरील गुन्हे रद्द झाले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते इंडिया टुडेच्या विशेष मुलाखतीत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वांत मोठा भ्रष्टचारी पक्ष असून यातील नेत्यांनी हजारो कोटी रुपयांचे घोटाळे केल्याचा आरोप गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. तसंच, अजित पवार आणि त्यांच्या इतर अनेक सहकारी नेत्यांच्या ईडी, आयकर विभाग, सीबीआयच्या चौकशा सुरू होत्या. गेल्यावर्षी मार्च महिन्यात अजित पवारांच्या घरी ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी छापा टाकला होता. परंतु, अजित पवार आता महायुतीत गेल्याने त्यांच्यावरील आरोपांचं गुऱ्हाळ आता संपलं आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत का? असा प्रश्न अमित शाहांना विचारण्यात आला होता.


सामान्य नागरिकांनाही न्याय दिला पाहिजे

त्यावर अमित शाह म्हणाले, “कोणावरीलही गुन्हे मागे घेतलेले नाही. सर्व प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत. त्यामुळे त्यांच्यावर न्यायालय कारवाई करेल. आमच्या मार्गदर्शनानुसार न्यायालय चालत नाही.” विरोधी पक्षात असल्यावर नेत्यांवर ईडी, सीबीआयचा दबाव आणला जातो. त्यांना सातत्याने नोटिसा पाठवल्या जातात. मग भाजपात आल्यावर या आरोपांची चर्चा कमी होते. या आरोपांवरील चौकशा का थांबतात? असंही अमित शाहांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले, तुम्ही म्हणत असाल तर आम्ही हे प्रकरण पुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवतो. पण इतर अनेक सामान्य नागरिकांचीही प्रकरणं प्रलंबित असतात. त्यांनाही न्याय दिला पाहिजे.

“राहुल गांधी, सोनिया गांधी, पी. चिंदबरम यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. पण त्यांची प्रकरणे आता कुठे सुरू आहेत. यांच्यावर ९-१० वर्षांपासून गुन्हे दाखल आहेत. आम्ही आमचं काम केलं. आता यंत्रणा यांची चौकशी करतील”, असंही अमित शाह म्हणाले.