Sangli Samachar

The Janshakti News

नागरिकांच्या जाहिरनाम्यासाठी गुरूवारी सर्वपक्षीय बैठक



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२० एप्रिल २०२४
सांगली लोकसभा मतदारसंघात राजकीय पक्ष जाहिरनामा प्रसिध्द करून अफलातून आश्वासने देतात, पण स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतात आणि गायब होतात. त्यामुळे नागरिकांचे प्रश्न उमेदवारांपुढे मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी गुरूवार दि. २५ रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना प्रत्यक्षात व व्हॉट्सअप करून दि. २३ एप्रिलपर्यंत प्रश्न मांडता येणार असल्याचे सतीश साखळकर, वि. द. बर्वे, तानाजी रूईकर यांनी सांगितले.


गणपती मंदिरापाठीमागे असलेल्या 'हरी का खाना खजाना' या ठिकाणी गुरूवारी सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत बैठक होणार आहे. निवडणुकीत लोकांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी सारे राजकीय पक्ष एकमेकांच्या उखाळया-पाकाळया काढण्यात दंग आहेत. काही दिवसांनी हे सारे राजकीय पक्ष एक उपचार म्हणून पक्षाचा जाहिरनामा प्रसिध्द करतील. लोकांना अफलातून आश्वासने देतील. लोक विसरतात आणि भाळतात असा त्यांचा समज असतो आणि दुर्दैवाने ते खरेही असते. निवडणुका झाल्या की उमेदवार गायब होतात आणि ते पुन्हा पाच वर्षांनी येतात. किमान सांगली लोकसभा मतदार संघातील प्रश्न काय आहेत? त्यासाठी काय करायला पाहिजे? यावर चर्चा तरी झाल्या पाहिजेत. बनावट का होईना आश्वासने तरी देतील. यासाठी नागरिकांनी आपल्या मनातील विकासाचे प्रश्न, राष्ट्रीय प्रश्न उमेदवारांना लिखित स्वरुपात अथवा व्हॉट्सअॅपवर किंवा मेसेजवर सतिश साखळकर मोबाईल नंबर ९८८१०६६६९९, तानाजी रुईकर मोबाईल नंबर ९३२३७७१११ यावर दि. २३ एप्रिलपर्यंत पाठवावेत. असे साखळकर, बर्वे व रूईकर यांनी सांगितले.