| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२७ एप्रिल २०२४
उद्धव ठाकरे आणि खा. संजय राऊत यांनी कोणाच्या तरी षडयंत्राला बळी पडून, सांगली लोकसभा मतदारसंघ हायजॅक केला. राज्य पातळीवरील बेसावध (?) असलेले काँग्रेस नेते या खेळीला बळी पडले, आणि त्यांच्यावर ठाकरेंच्या मागे फरपटत जाण्याची वेळ आली. सांगलीतील काँग्रेस नेत्यांना या आघाडी धर्माचे पालन करण्याचे आदेश आले...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज देशमुख, वरिष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी सांगली येथे मेळावा घेऊन, आपली बाजू मांडली. या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची व जिल्ह्यातील काँग्रेस प्रेमींची मने जिंकली ती जिल्ह्यातील व राज्यातील उभरते युवा नेतृत्व डॉ. विश्वजीत कदम यांनी. त्यांचे आक्रमक भाषण सर्वांनाच भावले. आगामी विधानसभेची गणिते लक्षात घेऊन नाईलाजाने त्यांनाही मशाल हाती घेण्याचे आदेश द्यावे लागले. पण या प्रकरणात एक 'गोम' लपली होती. जी कार्यकर्त्यांनी बरोबर ओळखली. नेत्यांना आघाडी धर्म व आपली आमदारकी महत्त्वाची होती व आहे, त्यात काही चुकीचेही नाही.
पण कार्यकर्त्यांना कुठे आमदारकी लढवायची होती व आहे ? त्यांना नेत्यांच्या दोस्ताला तर अंतर द्यायचे नव्हते, त्यामुळे आघाडीधर्म व नेत्यांचा आदेशपण पाळायचा हा 'हिशोब' होता...आणि एक नवा फंडा जन्माला आला...
"हातात मशाल मनात विशाल !"
आघाडी धर्म व नेत्यांचा आदेश पाळण्यासाठी त्यांनी हातात मशाल घेऊन आघाडीतील मित्र पक्षाबरोबर राहण्याचे ठरवले, पण मतदारांपर्यंत पोहोचवायचे ते 'पाकीट'...
आगामी आठ दहा दिवसात हेच चित्र सांगली लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात दिसून येणार आहे. काँग्रेस प्रमाणेच महाआघाडीतील इतर मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांची मनःस्थिती आहे. त्यांना नेत्यांचा आदेश महत्त्वाचा असला, तरी जवळचे वाटतात ते विशाल पाटीलच. म्हणूनच त्यांनी हे मशाल हातात घेतली असली तरी त्यांच्या मनातही विशालच ठाण मांडून बसलेले दिसतात.
एकूणच नेते एकीकडे कार्यकर्ते दुसरीकडे असे चित्र पहावयास मिळत आहेत. आता याचा परिणाम काय होतो, हे चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालातून दिसेल...