yuva MAharashtra अपंगत्व आलेल्या कामगारास पेन्शन देण्याचा ईएसआयचा निर्णय कौतुकास्पद : संदीप लोंढे

अपंगत्व आलेल्या कामगारास पेन्शन देण्याचा ईएसआयचा निर्णय कौतुकास्पद : संदीप लोंढे



सांगली समाचार  - दि. २ एप्रिल २०२४
सांगली : कामावर असताना अपघात होवून कायमचे अपंगत्व आलेल्या कामगारास नुकसान भरपाई तसेच महिन्याला सहा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे अध्यक्ष संदीप लोंढे यांनी केले.

ते विजयनगर येथील ऑल रजिस्ट्रर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित पेन्शन मंजुरी मत्राचे वितरण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावर बोलत होते. तर प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सागर बोराडे उपस्थित होते. यावेळी ईएसआयचे शाखाधिकारी संकेत कळंत्रे आणि उपशाखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी कुपवाड एमआयडीसीमधील इनक्रिश वेबटेक प्रा.लि. चे कामगार नंदकुमार शामराव मोहिते यांना पेन्शन मंजुरीचे पत्र दिले. नंदकुमार मोहिते इनक्रिश कारखान्यात वायरमन म्हणून कामास होते. कामावर असताना त्यांना विजेचा धक्का लागून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ते खाली पडले. त्यांना कायमचे अपंगत्व आले. छातीखालील पूर्ण शरीर निकामी झाले. उपचार करण्यासाठी त्यांनी शहरातील वेगवेगळ्या दवाखान्यात धाव घेतली. परंतु अपंगत्व दूर झाले नाही. मोहिते यांना कंपनीने घरात बसून पगार दिला जाईल, पत्नीला नोकरी दिली जाईल अशी हमी दिली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही. मोहिते यांनी कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली. कंपनीने ती दिली नाही. ८५ टक्के अपंगत्व आलेल्या मोहिते यांच्यावर तसेच त्यांच्या कुटूंबावर उपासमारीचे संकट कोसळले, कंपनीकडे त्यांनी १४ लाख १४ हजार ६८६ रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली. पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडेही दाद मागितली. अखेर मोहिते यांनी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाकडे धाव घेतली. 


आपल्यावर कोसळलेले संकट आणि होत असलेली उपासमार याची कैफियत मांडली. संघाने पालकमंत्री, मुख्यमंत्री, इएसआय ऑफीस, जिल्हाधिकारी कार्यालय तथा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष यांच्याकडे धाव घेवून पत्रव्यवहार सुरु केले. पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने पाठपुरावाही सुरु केला. अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत ते जुने आहे. नव्याने तपासणी करा, नवा अहवाल द्या, नवे प्रमाणपत्र आणा असे सांगून संघाच्या पदाधिकाऱ्यांना, जगण्यासाठी धडपणाऱ्या मोहिते यांना हेलपाटे मारायचे धोरण स्विकारले होते. मात्र संघाने चिकाटी सोडली नाही. मोहिते यांना न्याय मिळालाच पाहिजे या भावनेने संघाचे पदाधिकारी सर्वत्र धावाधाव करत होते. सांगली सिव्हिलमध्ये नव्याने तपासणी झाली. नव्याने अहवाल आला. नव्याने प्रमाणपत्र मिळाले. अखेर मोहिते यांना ८५ टक्के कायमचे अपंगत्व आल्याच्या निष्कर्षावर सगळेच आले. इएसआयचे सांगली, सातारा, पुणे येथील विभागीय ऑफीसपर्यंत सुरक्षा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धड़का मारल्या, अखेर या पाठपुराव्याला यश आले.

ईएसआय कार्यालयाकडून मोहिते यांना साडेतीन ते चार लाख रुपयांची भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. महिन्याला साडेपाच ते सहा रुपयांची पेन्शन प्रॉव्हिडंट फंड अशी देणी देण्याचा निर्णय ही झाला. मोहिते आणि त्यांच्या कुटूंबाचा औषधपाण्याचा खर्च इएसआयच्या माध्यमातून देण्याचे ठरले. मोहिते यांना अखेर न्याय मिळाला. राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप लोंढे, डॉ. अनिल दबडे, धोंडीराम शिंदे, सचिव दिपक ढवळे, विधी सल्लागार अॅड. बाळासाहेब वाघमोडे, जिल्हाध्यक्ष अनिल दडगे तसेच इएसआय सांगलीचे शाखाधिकारी संकेत कळंत्रे, उपशाखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी प्रास्ताविक सचिव दिपक ढवळे यांनी केले तर आभार डॉ. अनिल दबडे यांनी मानले. कार्यक्रमाला संस्थेचे महासचिव बाळासाहेब ढमाले, सल्लागार धोंडीराम शिंदे, एन. एम. कनवाडकर, ऑल रजिस्ट्रर्ड न्यूज पेपर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रा. डॉ. सागर बोराडे, मारुती नवलाई, संतोष (नाना) खामकर, अभिजित पवार, इनक्रिश वेबटेकचे डायरेक्टर राजेंद्र पाचोरे, शामू लोंढे, विक्रम लोंढे, रमेश मेनकर, निसार इनामदार, राजू भोसले स्वप्निल मिरजे, आदित्य ढमाले, राहूल मोरे, आदी उपस्थित होते.