Sangli Samachar

The Janshakti News

दबावतंत्रानंतरही सांगली लोकसभेला विशाल पाटलांनी शड्डू ठोकला; माघार नाहीच, काँग्रेस काय भूमिका घेणार ?



| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि.२२ एप्रिल २०२४
सांगली लोकसभा जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी माघार घेतलेली नाही. त्यामुळे सांगली लोकसभेला तिरंगी लढत अटळ झाली आहे. विशाल पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पक्षाने दिले आहेत. त्यामुळे आता काँग्रेस काय कारवाई करणार? याकडे आता लक्ष आहे. विशाल पाटील यांना आतापर्यंत पाठिंबा देणारे स्थानिक आमदार काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीच्या मोठ्या हितासाठी पाटील यांनी माघार घ्यावी, असे म्हटले होते.


मात्र, सांगलीत अखेर विशाल पाटील यांची बंडखोरी कायम राहिली आहे. विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने विशाल पाटील यांचे मन वळवण्यात काँग्रेस नेत्यांना अपयश आल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची शिष्टाई अयशस्वी ठरली आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे सांगली लोकसभेसाठी तिरंगी लढत निश्चित आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. सांगली लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात असल्याने प्रत्येक बूथला दोन ईव्हीएम मशीन लावावे लागणार आहेत.