सांगली समाचार - दि ७ एप्रिल २०२४
मुंबई - आम्ही उठाव केला म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळे चाखता आली. त्यामुळे आपल्या पक्षाचे महत्त्व आहे. रायगड, शिरूर मतदारसंघ मित्रपक्षाला दिले, त्यापाठोपाठ हक्काचे परभणी, उस्मानाबाद मतदारसंघ देऊन युतीधर्म पाळला, पण मित्रपक्षाकडून युतीधर्म पाळला जातोय का, असा सवाल शिंदेसेनेच्या मंत्र्यांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आल्याने 'वर्षा' निवासस्थानी शनिवारी झालेली बैठक हायहोल्टेज ठरली. सर्व्हेचे कारण पुढे करीत खासदारांचे तिकीट कापले, मात्र आता दबावाला बळी पडू नका. कोणत्याही परिस्थितीत नाशिक, ठाणे, पालघर, औरंगाबाद, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ सोडू नका, अशी मागणी मंत्र्यांकडून करण्यात आली. महायुतीचे जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. शिंदे यांना विद्यमान खासदार बदलावे लागले. तसेच काही मतदारसंघही मित्रपक्षांना सोडावे लागले याचे तीव्र पडसाद बैठकीत उमटले. अन्य पक्षाचे लोक आपल्या मतदारसंघांवर दावा करतात, आतापर्यंत चार मतदारसंघ सोडण्यात आले, हे योग्य नसल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांकडून सामंजस्याचे टॉनिक
आपल्या संतप्त मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सामंजस्याचे टॉनिक दिले. थोड्याबहुत कुरबुरी सगळीकडेच असतात. जागावाटपाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. तीन पक्ष एकत्र आलोय तर काही हिस्सा द्यावाच लागेल. त्यामुळे तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळा. भाजपच मोठा भाऊ असून एक-दोन जागा जास्त लढवल्या तर फरक पडत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.