Sangli Samachar

The Janshakti News

नरेंद्र मोदी इतके चिंतातूर का झाले आहेत ?



सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि.२६ एप्रिल २०२४
नरेंद्र मोदींनी ठाम विश्वास व्यक्त केला होता की जूनमध्ये ते खणखणीत बहुमत मिळवून विजयी होतील आणि पुन्हा सत्ता स्थापन करतील. मात्र आता त्यांच्या आवाजातून चिंता ध्वनित होऊ लागली आहे. त्यांच्या समर्थकांनी वर्षानुवर्षांपासून जे सोन्या-चांदीचे दागिने साठवले आहेत, ते 'ज्यांची मोठी कुटुंबे असतात' अशा अल्पसंख्याकांना म्हणजेच मुस्लिमांना वाटून टाकण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप ते करू लागले आहेत.

काँग्रेसने त्यांच्या या आरोपाची 'धडधडीच असत्य' अशी संभावना केली आहे. प्रत्यक्षात भाजपने काँग्रेसला सत्तास्थानावरून पदच्युत केले त्याला आता दहा वर्षे लोटली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असे कुठेही म्हटलेले नाही की तो पक्ष रॉबिन हूड शैलीत श्रीमंतांची संपत्ती लुटून ती गरीबांमध्ये वाटून टाकणार आहे. 'द गॉड दॅट फेल्ड' चा असा प्रयोग रशिया आणि पूर्व युरोपात करण्यात आला, मात्र त्याची परिणती केवळ गरिबीच्या विभाजनात झाली.


मोदींच्या या दाव्यामुळे त्यांना भाजपच्या पारंपरिक मतदारांचे लक्ष वेधण्यात यश आले आहे, मात्र त्याचे पडसाद काँग्रेसच्या गोटातही उमटले आहेत. परंतु विरोधकांना फार चिंता करण्याचे कारण नाही. काही तज्ज्ञ अंदाज वर्तवत असले, तरीही प्रत्यक्षात यावेळी कोणतीही लाट वगैरे नाही. मोदींचा करिष्मा आता विरू लागला आहे. ते सत्ता राखण्यासाठी झगडत असल्याचे स्पष्टच दिसते. त्यांना त्यांच्या विरोधकांच्या कमरेखाली वार करावे लागत आहेत, यावरूनच हे स्पष्ट होते की त्यांना लोकसभेत साधारण ३०० जागांचा आकडा गाठणेही कठीण जाणार आहे.

लोकसभेत ४०० पार जाण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी मोदी स्वत:च्या भात्यातील प्रत्येक शस्त्र आजमावून पाहत आहेत आणि जवळपास रोजच नवनवी शस्त्रे शोधण्यासाठी धडपडताना दिसत आहेत. ते विजयी होतीलही, मात्र त्यांच्या या अस्वस्थतेमुळे त्यांना गेल्या निवडणुकांच्या तुलनेत कमी जागा मिळतील. भाजपने गेल्या सार्वत्रिक निवडणुकांएवढ्या म्हणजे साधारण ३०० जागा जिंकल्या, तरीही माझ्यासाठी ते एक आश्चर्यच असेल.


आजचा मतदार पूर्वीसारखा सुस्तावलेला नाही. त्याच्यापर्यंत अनेक आवाज पोहोचतात आगदी विरोधी आवाजही पोहोचतात. त्याच्या आकांक्षांनी लक्षणीय उंची गाठली आहे. विकास आणि दूरचित्रवाणी वाहिन्या यांमुळे कमकुवत आणि आज्ञाधाराक मतदारांचे रूपांतर बारकाईने विचार करणाऱ्या मतदारांत झाले आहे. मोदींची भाषणे श्रोत्यांमध्ये एक उत्साहाची लहर निर्माण करत. त्यांच्या वक्तव्यांनी मतदारांच्या मनात आशेचा किरण आणला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे.

त्यांच्या स्वत:च्याच अतिधाडसी विधानांनी जनतेच्या मनातील आशा मालवली आहे. प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये येतील, हे आश्वासन वाऱ्याबरोबर उडून गेले. त्याऐवजी एकूण लोकसंख्येपैकी ६० टक्के शिधापत्रिकाधारकांना पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ दरमहा मोफत मिळू लागले. गरिबातल्या गरिबांना तगून राहण्यासाठी हे पुरेसे ठरत असले, तरीही ज्यांना बरे आयुष्य हवे आहे अशांना तेल, डाळी आणि स्वयंपाकाच्या गॅसचीही गरज असते. महाराष्ट्रातल्या पालघर जिल्ह्यातील महिलांनी त्यांना मोदींची प्रतिमा असलेल्या पिशव्यांतून साड्या वाटण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना हे स्पष्टच सांगितले. त्यांनी साड्या परत केल्या आणि त्याऐवजी रोजगार द्या अशी मागणी केली. त्यांच्या श्रमांचा ज्यांना लाभ होतो, त्यांच्यासारखे आयुष्य या श्रमिकांनाही जगायचे आहे. तेवढे समृद्ध नाही, तरी किमान पोषणाच्या गरजा पूर्ण होतील, एवढा तरी स्तर त्यांना अपेक्षित आहे.

भारतीय नागरिकांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यासाठी मोदी प्रयत्नशील आहेत, याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. (अर्थात सीएए आणि एनआरसीमुळे अपात्र ठरणाऱ्यांना वगळून). आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे घडवून आणण्याासठी त्यांना तिसऱ्यांदा विजयी होणे आवश्यक आहे. त्यासाठी ते विरोधकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत- जसे अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या अगदी काही दिवस आधी नामोहरम केले गेले. त्यांच्या तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना ईडीने समन्स बाजवले. तेही लोकसभा निवडणुकांच्या काळात. परिणामी त्यांना प्रचार करणे शक्य होत नाही.

पण अशा कमरेखालच्या क्लृप्त्या मतदारांना पसंत न पडल्याचे दिसते. आमच्या मुंबईत अगदी निरक्षरांनाही आता या क्लृप्त्या कळू लागल्या आहे. मोदींचे प्रशंसकही यामुळे आता त्यांच्याविरोधात जाताना दिसतात. माझे वैयक्तिक मत असे आहे की मोदी जिंकण्यासाठी आतीच प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रतिमा संवर्धन सल्लागारांनी त्यांच्याभोवती जे वलय निर्माण केले होते, हे हळूहळू पुसट होऊ लागले आहे.

राम मंदिराच्या उद्घाटनात कोणालाही सहभागी करून न घेता सारे लक्ष केवळ स्वत:वरच केंद्रीत राहील, याची काळजी घेण्याचेही अनेकांच्या मनात नकारात्मक पडसाद उमटले आहेत. या वर्तनात मानवतेचा लवलेशही नव्हता. द्वारकेत समुद्रात बुडी घेणे हे तर ओढावून घेतलेले अरिष्टच होते. ज्याने हे सुचवले, त्या व्यक्तिला पंतप्रधानांनी कामावरून काढून टाकले पाहिजे.

माझ्या मते मोदीजींनी गेल्या दशकभरात जी काही प्रतिष्ठा प्राप्त केली होती, ती अशा प्रसिद्धीच्या मोहापायी आणि विरोधकांच्या प्रत्येक कृतीवर सतत टीकेची झोड उठवल्यामुळे काही प्रमाणात का असेना लयाला जाऊ लागली आहे. त्यांनी स्वयंपाकाच्या गॅसची सबसिडी आणि दारिद्य्र रेषेखालील कुटुंबांसाठीच्या अन्य कल्याणकारी योजनांची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेऊन मध्यस्तांची फळी उद्ध्वस्त केली. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गरिबांना घरे बांधून दिली. संरक्षणाच्या आघाडीवरील चित्रही त्यांच्या कार्यकाळात सुधारले. अर्थात आर्थिक आणि संरक्षणाच्या क्षेत्रात भारतापेक्षा अधिक सक्षम असलेल्या चीनने दादागिरी सुरूच ठेवली आहे.

मोदींना त्यांचे लक्ष गाठणे सोपे नाही, असेच दिसते. भाजप ३७० आणि एनडीए ४०० जागांवर विजयी होणे नक्कीच शक्य नाही. दक्षिण भारतात विजयाची वाट मोकळी करण्यासाठी भाजपने बरेच प्रयत्न केले. त्यांना आंध्र प्रदेशात काही प्रमाणात यश मिळाल्याचे दिसते. तिथे त्यांनी टीडीपीच्या चंद्राबाबू नायडूंशी युती केली आहे आणि त्याचा लाभ त्यांना मिळण्याची चिन्हे आहेत. वाय. एस जगन मोहन रेड्डी आणि वाय. एस. शर्मिला या भावा-बहिणीतील फूट भाजपच्या पथ्यावर पडेल, असे दिसते. नेहमीच भाजपसाठी आव्हान ठरत आलेल्या तमिळनाडूमध्ये त्यांनी अण्णामलाई यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्याचाही लाभ त्यांना होईल. वाळीत टाकलेला पक्ष ही ओळख पुसून मतदारांना अपेक्षा असलेला पक्ष अशी ओळख निर्माण करण्यात भाजपला यश आले आहे. भाजप तिथे खाते उघडू शकतो आणि तसे झाल्यास त्यांच्यासाठी ते लक्षणीय यश ठरेल.

केरळमध्ये ते ख्रिश्चनांची काही मते मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. तेथील मतदारांविषयी राजकीय विश्लेषकांत उत्सुकता आहे. भाजपचे दक्षिणेतील सर्वाधिक खासदार हे कर्नाटकातून येतील, कारण तिथे या पक्षाने अस्तित्त्व निर्माण केले आहे. तरीही २०१९ प्रमाणे २८ पैकी २५ जागा जिंकणे शक्य होईल, असे दिसत नाही. त्यांनी त्यांच्या दक्षिणेतील एकूण जागांमध्ये भर घातली तरीही ती नाममात्र असेल.

महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशात विरोधक गेल्या निवडणुकांपेक्षा चांगली कामगिरी करतील, असे दिसते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेत फूट पाडल्याचा भाजपला त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होईल, असे दिसत नाही. बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सतत बाजू बदलणे मतदारांच्या पचनी पडलेले नाही.

गुजरात भाजपच्या बाजूनेच राहील. भाजपला जर कुठे लाभ होणार असेल, तर तो पश्चिम बंगालमध्ये होईल. या महत्त्वाच्या राज्यात हिंदुत्वाचे राजकारण ममतांची पकड सैल करण्यात यशस्वी ठरले आहे. त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष २०१९च्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक जागा गमावेल आणि त्याचा लाभ भाजपला होईल, असे दिसते.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येतील, मात्र यावेळी त्यांचे विरोधक अधिक निग्रहाने समोर उभे ठाकतील. त्यामुळे त्यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांना निवडणुकीच्या काळात तुरुंगात टाकण्यापासून आणि घरे आणि दुकाने बुलडोझरने जमीनदोस्त करण्यापासून रोखता येईल, अशी अपेक्षा आहे.