Sangli Samachar

The Janshakti News

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, आता क्रेडिट सिस्टीमद्वारे शिक्षण| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१५ एप्रिल २०२४ -
शिक्षणात नवनवीन बदल केले जात आहेत. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क अंतर्गत विविध प्रयोग राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पावले टाकली जात आहेत. याच धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शाळांमध्ये आणखीन एक महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल येत्या शैक्षणिक वर्षांपासून (सन २०२४-२५) लागू करण्यात येणार आहे. शाळांमध्ये क्रेडिट सिस्टीम प्रणाली लागू करण्यात येणार आहे. हा पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येणार आहे.

काय आहे क्रेडिट सिस्टीम

सहावी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता क्रेडिट सिस्टीम असणार आहे. या प्रणाली अंतर्गत नववीमध्ये वर्षभरातून २१० तास प्रत्येक विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यास ४०-५४ क्रेडिट गुण दिले जाणार आहेत. परंतु त्यासाठी दोन अटी असणार आहे. पहिली अट म्हणजे सर्व विषयांत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. दुसरी अट म्हणजे वर्षभरात वर्गात ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असणार आहे. विद्यार्थ्याने पाच विषय घेतल्यास त्यांचा २१० प्रती विषयाप्रमाणे १०५० तास अभ्यास होते. तसेच यामध्ये १५० तास अंतर्गत मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी असणार आहे. प्रत्येक विषयासाठी सात क्रेडिट असणार आहे. म्हणजेच सक्तीचे असणारे पाच विषय घेतले तर त्याला ४० क्रेडिट मिळेल. जर विद्यार्थी सहा किंवा सात विषय घेईल तर हे क्रेडिट ४७ आणि ५४ पर्यंत जाईल.


नववी प्रमाणे अकरावीत विद्यार्थ्यांना क्रेडिट

नवीन प्रमाणे अकरावीमध्ये विद्यार्थ्यांना क्रेडिट मिळणार आहे. अकरावीत एक भाषा आणि चार विषय उत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्यास ४० क्रेडिट दिले जातील. नववीप्रमाणे अकरावीत अंतर्गत मूल्यांकन, शारीरिक शिक्षण, कार्यानुभव आणि सामान्य अभ्यासासाठी १५० तास असणार आहेत. विद्यार्थ्यांनी हे विषय घेतल्यास ४७ किंवा ५४ क्रेडिट मिळणार आहे.

क्रेडिट अ‍ॅकेडमिक बँकेत जमा होणार

विद्यार्थ्यांना मिळणारे क्रेडिट अ‍ॅकडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होणार आहे. सीबीएसई बोर्डाने प्रत्येक शाळेला या प्राणालीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या प्रोजक्टमध्ये सहभागी होणाऱ्या शाळांना बोर्डाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.