Sangli Samachar

The Janshakti News

अबकी बार 400 पार अशक्य; भुजबळांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ



| सांगली समाचार वृत्त |
नाशिक - दि.२८ एप्रिल २०२४
सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं आहे. उर्वरीत पाच टप्प्यांतील मतदानासाठी प्रत्येक पक्षाकडून प्रचारसभा घेतल्या जात आहेत. भाजपा अबकी बार 400 पाराचा नारा देत मैदानात उतरलं आहे. भाजपाचे घटकपक्ष याच नाऱ्यावर प्रचारसभा दणाणून सोडत आहेत. असं असताना मात्र, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलेल्या एका वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होऊ शकतो. अबकी बार 400 पार अशक्य असल्याचं भुजबळ म्हणाले आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे की, 2014 आणि 2019 सारखा भाजपाचा मार्ग आता सहज सोपा राहिलेला नाही. त्यांनी दावा केलाय की, ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे, ज्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळण्याची शक्यता आहे. भुजबळ असंही म्हणाले की, NDA चा मार्गही यंदा फार कठीण आहे. तरीसुद्धा पतंप्रधान मोदींच्या क्षमतेवर लोकांना विश्वास आहे आणि लोकांना असं वाटतं की, त्यांनी तिसऱ्यांदा भारताचं नेतृत्व करावं. तसंच, त्यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेण्यामागचं कारणही सांगितलं ते म्हणाले, मी कधी स्वत:साठी सीट मागत नाही. त्यामुळे नाशिकमधून तीन आठवड्यानंतरही नाव घोषित करण्यात आलं नाही, तेव्हा मी माघार घेतली.

भुजबळांनी NDTV ला एक मुलाखत दिली. त्या मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करताना, महाराष्ट्रात भाजपासाठी लोकसभा निवडणूक सोपी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 2014 आणि 2019 मध्ये भाजपाच्या बाजूने लोकांचं मताधिक्य होतं. परंतु यावेळी मात्र राज्यातले दोन महत्त्वाचे पक्ष फुटले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती जास्त आहे.

यावेळी सहानुभूतीची लाट …

भुजबळ म्हणाले की, मला वाटतं की यावेळी सहानुभूतीची लाट असू शकते. ज्याप्रकारे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडली. तसंच, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही दोन चुली झाल्या आहेत. त्याचे पडसाद प्रचार सभांमध्येही दिसून येत आहेत.