yuva MAharashtra 'नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं'; मोहन भागवत यांचं सूचक विधान

'नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं'; मोहन भागवत यांचं सूचक विधान



सांगली समाचार - दि. २९ मार्च २०२४
नागपूर  - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विविध विषयांवर भाष्य करताना नागरिकांनी आणि राज्यकारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांनी कोणती मूल्य जपली पाहीजेत, यावर विवेचन केले. तसेच राजा आणि राज्यकारभार कसा असावा? याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे.


मोहन भागवत म्हणाले की, पैशांची उधळपट्टी न करता समाजात साधेपणाने आणि काटकसरीने रहावे, स्वदेशीची कास धरुन गरजूंना आर्थिक मदत करावी. घरात दोन मोटारगाड्या, महागडा स्मार्ट रंगीत दूरचित्रवाणी संच आदी चैनीच्या वस्तूंची खरोखर गरज आहे का? याचाही प्रत्येक सुजाण नागरिकाने विचार करावा. नागरिकांनी नियमांचे पालन करुन पर्यावरणाचे रक्षण करावे. सुजाण, शिस्तप्रिय व देशभक्त नागरिक आणि समाज असेल, तर तो देश मोठा होतो. यादृष्टीने सामाजिक संस्थांनी नागरिकांमध्ये ही जाणीव व प्रेरणा निर्माण करण्यासाठी मनपरिवर्तनाची जबाबदारी पार पाडावी.

राजा हा समाजामुळे असतो आणि नीट राज्यकारभार केला नाही, तर त्याला पायउतारही व्हावे लागते', अशी अनेक उदाहरणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाच्या उत्थान व पतनावर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचीच जबाबदारी महत्त्वाची असते, असंही मोहन भागवत म्हणाले.