Sangli Samachar

The Janshakti News

चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरेंचा फोन, सांगलीच्या उमेदवारीवर मोठं भाष्य



सांगली समाचार - दि. १९ मार्च २०२४
सांगली - आपल्या उमेदवारीबद्दल आजिबात धाकधूक नाही, उमेदवारी फिक्स असल्याचं सांगत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी त्यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आल्याचं सांगितलं. 21 मार्च रोजी मिरजेत होणाऱ्या सभेवर उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली असल्याचंही चंद्रहार पाटलांनी सांगितलं. सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये वाद होण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ पातळीवर काय सुरू आहे याची मला कल्पना नाही, पण माझी उमेदवारी फिक्स आहे असा विश्वास चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी आपण प्रचार सुरू केल्याचंही ते म्हणाले. चंद्रहार पाटील म्हणाले की, माझ्या उमेदवारीबाबत आता मला अजिबात धाकधूक वाटत नाही. माझी उमेदवारी 'मातोश्री'मधून फायनल झाली आहे. वरिष्ठ पातळीवर आता काय चर्चा चालू आहे याची मला कल्पना नाही सोमवारी रात्रीच उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. 21 मार्च रोजी मिरजेत होणाऱ्या सभेबाबत चर्चा झाली. आम्ही सभेच्या तयारीला लागलोय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळे एकत्र काम करणार. जो उमेदवार असेल त्याच्या मागे उभे राहण्याचा निर्णय झाला आहे.

सांगलीवरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरुच

सांगली लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसनेनेमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. या आधी शिवसेनेच्या कोल्हापूची जागा ही शाहू महाराजांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. कोल्हापुरातून शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेना लढवणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं.


संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर सांगलीतील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला. या ठिकाणाहून विशाल पाटील यांनी तयारी केली होती. त्यामुळे काहीही झालं तरी सांगलीची जागा ही काँग्रेसकडेच राहावी, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल अशी भूमिका काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी घेतली आहे.

चंद्रहार पाटलांची उमेदवारी 'मातोश्री'वरून जाहीर

राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नसला तरी उद्धव ठाकरे यांनी या आधीच सांगलीतून चंद्रहार पाटील हे मशाल चिन्हावर निवडणूक लढवतील असं जाहीर केलं. त्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेत्याची धाकधूकही वाढल्याचं दिसून आलं. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातोय. पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये या ठिकाणी भाजपचे संजयकाका पाटील यांनी बाजी मारली. आताही भाजपने त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.