Sangli Samachar

The Janshakti News

सी व्हिजिल ॲपवर पहिली तक्रार, ६० मिनिटांत निपटारा; भाजप पदाधिकाऱ्याच्या वाहनावर कारवाई



सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आचारसंहितेचा भंग वा तत्सम गैरप्रकारांविषयी तक्रार करण्यासाठी उपलब्ध केलेल्या सी – व्हिजिल ॲपवर पहिली ऑनलाईन तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या ६० मिनिटांच्या आत भरारी पथकाने तिचा निपटारा केला. रविशंकर मार्गावरील कुर्डुकरनगर भागात भाजपचे पक्षचिन्ह असणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. चिन्ह स्टिकर लावून झाकण्यात आले आहे.


निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदारांना सी व्हिजिल ॲपची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिक आक्षेपार्ह छायाचित्र वा चित्रफित या ॲपवर पाठवून त्याची तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारीवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई केली जाते. त्यासाठी १०० मिनिटांच्या आत तक्रारी निकाली काढण्याचे सूचित करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात यासाठी खास भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता भंगची पहिली तक्रार या ॲपवर दाखल झाली. रवीशंकर मार्गावरील कुर्डुकरनगर भागात उभ्या असणाऱ्या वाहनावर भाजपचे कमळ हे चिन्ह व झेंडा असल्याची बाब आपण सी व्हिजिल ॲपवर तक्रारीद्वारे मांडल्याचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल गायकवाड यांनी सांगितले.

ही तक्रार येताच भरारी पथकाने उपरोक्त ठिकाणी धाव घेऊन छाननी केली. तक्रारीत तथ्य असल्याचे लक्षात आल्यावर वाहन मालकाचा शोध घेतला गेला. अग्रवाल नामक व्यक्तीच्या नावावर हे वाहन आहे. पण ती व्यक्ती घरात नव्हती. त्यांच्या कुटुंबियांना तक्रारीची कल्पना देऊन मोटारीवरील भाजपचे पक्षचिन्ह स्टिकरने झाकण्यात आले. तासाभराच्या आत ही कारवाई झाली. या बाबतची माहिती भरारी पथकाचे प्रमुख सुनील महाजन यांनी दिली. पहिलीच तक्रार तासाभराच्या आत निकाली निघाल्याने तक्रारदाराला सुखद धक्का बसला.