Sangli Samachar

The Janshakti News

'बँक लॉकर'ची सुरक्षा आपल्याच हातात !सांगली समाचार - दि. २१ मार्च २०२४
मुंबई  -'आजकाल घरात सोन्याचे दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे सुरक्षित राहिले नसल्याने 'बँक लॉकर' भाड्याने घेणे अन् त्यात स्वतःचे दागिने अन् महत्त्वाची कागदपत्रे ठेवणे, ही सामान्य गोष्ट झाली आहे. आपल्या घरापेक्षा 'बँक लॉकर' ही सुरक्षित जागा असली, तरी ती आज १०० टक्के सुरक्षित राहिलेली नाही. जरी बँका या 'लॉकर्स'साठी कडक सुरक्षाव्यवस्था जसे की, २४ घंटे कॅमेरे, 'अलार्म' (धोक्याची घंटा) सुविधा , प्रतिबंधित क्षेत्र इत्यादी उपाय योजत असल्या, तरी आजकाल 'बँक लॉकर' फोडीचे गुन्हे वाढीला लागले आहेत, तसेच अधिकोष कर्मचार्‍यांकडून आपापसांत संगनमताने लॉकरमधील मौल्यवान वस्तू चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आपण कधी या 'बँक लॉकर'च्या सुरक्षेचा विचार केला आहे का ? या लॉकरमध्ये ठेवलेल्या गोष्टी खरंच सुरक्षित असतात का ? अशा लॉकर फोडीच्या घटना घडतात, त्या वेळी ग्राहक म्हणून आपण काय करू शकतो ? या चोरीचे उत्तरदायित्व कोण घेते ? या लॉकर्सना काही विमा संरक्षण असते का ? याविषयीची माहिती आज आपण या लेखाद्वारे घेणार आहोत.

१. नैसर्गिक आपत्ती किंवा दंगल यांसह अन्य घटनांमुळे होणारी हानी यांविषयी भारतीय रिझर्व्ह बँकेचा नियम

नैसर्गिक आपत्ती किंवा आंग्ल भाषेत ज्याला 'ॲक्ट ऑफ गॉड्स' म्हटले जाते, म्हणजे भूकंप, पूर, वीज पडणे, वादळ, अशा घटनांमुळे होणार्‍या हानीला संबंधित बँक उत्तरदायी नसते, तसेच नागरी अशांतता, दंगल, युद्ध, आतंकवादी आक्रमण यांमुळे होणार्‍या हानीलाही अधिकोष उत्तरदायी नसते; पण जर आग, चोरी, दरोडा, इमारत कोसळणे किंवा अधिकोष कर्मचार्‍यांकडून गैरव्यवहार यांमुळे बँकेच्या लॉकर्सना हानी पोचून त्यातील मौल्यवान वस्तूंची हानी झाली, तर भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुधारित नियमांनुसार संबंधित बँक ग्राहकाला त्या लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट हानीभरपाई देण्यास बांधील असते. उदाहरणार्थ लॉकरचे वार्षिक भाडे हे २ सहस्र ५०० रुपये असेल, तर हानीभरपाई ही २ लाख ५० सहस्र रुपये मिळेल. लॉकरमध्ये ठेवलेल्या ऐवजाचे मूल्य किती आहे ? हा मुद्दा इथे विचारात घेतला जाणार नाही.


२. 'बँक लॉकर'साठी विमा संरक्षण घेणे महत्त्वाचे आणि विम्याचे ३ प्रकार

इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट, म्हणजे बँकेकडून या लॉकर्स सुविधा पुरवतांना ग्राहकांना कुठलेही विमा संरक्षण पुरवले जात नाही. या लेखात म्हटल्याप्रमाणे काही ठराविक घटना जशा की, चोरी, दरोडा, आग इत्यादी घडल्या, तरच बँकेचे उत्तरदायित्व लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या १०० पट आहे जे की, दागिन्यांच्या किमतीचा विचार केला, तर फार न्यून हानीभरपाई असू शकते. म्हणून 'बँक लॉकर'च्या ग्राहकांनी आपल्या लॉकर्ससाठी स्वत: बाजारातून विमा संरक्षण विकत घेणे महत्त्वाचे आहे. हे विमा संरक्षण ३ प्रकारे घेता येऊ शकते.

अ. गृह विमा : या योजनेत घरासह घरातील दागिन्यांना विमा संरक्षण घेता येते. काही विमा आस्थापने याच योजनेत 'बँक लॉकर'मधील दागिन्यांनाही विमा संरक्षण देतात.

आ. 'ऑल रिस्क ज्वेलरी कव्हर' (सर्व जोखिमांमध्ये दागिन्यांचा विमा) : नावाप्रमाणे या योजनेत घरातील दागिने, अंगावर परिधान केलेले दागिने आणि 'बँक लॉकर'मधील दागिने यांच्यासाठी विमा संरक्षण घेता येते.

इ. 'बँक लॉकर' विमा संरक्षण : यामध्ये 'बँक लॉकर'मधील दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे यांसाठी विमा संरक्षण घेता येते.

पूर्वीच्या काळी घरात दागिने सुरक्षित रहावेत; म्हणून लोखंडी तिजोर्‍या वापरल्या जात असत; पण जसा काळ पालटला तशा या तिजोर्‍याही सुरक्षित राहिल्या नाहीत; म्हणून 'बँक लॉकर'ची सुविधा आली. आज 'बँक लॉकर्स'ही सुरक्षित नाहीत; म्हणून प्रत्येकाने वरील ३ पर्यायांपैकी सोयीचा पर्याय निवडून स्वतःचे 'बँक लॉकर' सुरक्षित करणे आवश्यक आहे.