Sangli Samachar

The Janshakti News

सांगली लोकसभा उमेदवारीचा तिढा कायम; आक्रमक काँग्रेस मैत्रीपूर्ण लढण्यास तयारसांगली समाचार  - दि. १७ मार्च २०२४
सांगली - सांगलीलोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचा उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने लोकसभेची तयारी केलेली असल्याने ही हक्काची जागा पक्षाला मिळावी; अन्यथा महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या उमेदवारासोबत आम्ही मैत्रीपूर्ण लढण्यासही तयार आहोत, असा दुसरा पर्याय जिल्हा काँग्रेसने महाविकास आघाडीपुढे ठेवल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीतील शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मिरजेत २१ मार्चला जाहीर सभा आहे. त्यामुळे ही जागा आघाडीच्या जागावाटपात शिवसेनेला जाण्याची भीती काँग्रेसजनांना वाटत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, संघटन सचिव के. सी. वेणुगोपाल, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील व शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सांगलीच्या जागावाटपाविषयी शुक्रवारी मुंबई येथे चर्चा झाली. या वेळी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागा काँग्रेसला सोडण्याची आग्रहाची भूमिका मांडली; परंतु, सांगलीच्या जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.


सांगली हा काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात काँग्रेसचा गट आहे. ही जागा गतपंचवार्षिक निवडणुकीत स्वाभिमानीला देण्यात आली. आता पुन्हा ही जागा घटकपक्षाला सोडण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सांगलीतील काँग्रेस खिळखिळी करण्याचा व संपविण्याचा विरोधकांचा डाव आहे. तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, अशी भूमिका काँग्रेसचे नेते व पदाधिकारी यांनी घेतली आहे.

महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक घटकपक्षाला सांगलीच्या जागेवर दावा करण्याच्या अधिकार आहे; परंतु, जागावाटप करताना हा मतदारसंघ कोणत्या पक्षासाठी पोषक आहे, याचा विचार व्हायला हवा. सांगलीची जागा काँग्रेसला सोडण्याचा आमचा पहिला आग्रह आहे. अन्यथा घटकपक्षातील उमेदवारांसोबत मैत्रीपूर्ण लढतीची आमची तयारी आहे. - पृथ्वीराज पाटील, शहराध्यक्ष, काँग्रेस