Sangli Samachar

The Janshakti News

लोकशाहीतील मोठ्या उत्सवाला प्रारंभ : नरेंद्र मोदीसांगली समाचार  - दि. १७ मार्च २०२४
नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने आज लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सात टप्‍प्‍यांमध्‍ये ही निवडणूक पार पडणार असून ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लोकशाहीतील मोठ्या उत्सवाला प्रारंभ झाला असल्‍याचे म्‍हटले आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये म्‍हटलं आहे की, , लोकशाहीचा सर्वात मोठ्या उत्‍सव सुरु झाला आहे. निवडणूक आयोगाने 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आम्ही भाजप-एनडीए निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहोत. आम्ही जनतेपर्यंत जात आहोत.

येणारी 5 वर्षे हा आपल्या सामूहिक संकल्पाचा काळ असेल. ज्यामध्ये आपण भारताच्या पुढील एक हजार वर्षांच्या विकास प्रवासाचा रोडमॅप तयार करू. हा काळ भारताचा सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक समृद्धी आणि जागतिक नेतृत्वाचा साक्षीदार असेल, असेही पंतप्रधान मोदींनी म्‍हटले आहे.


जेव्हा देशवासी म्हणतात, "मी मोदींचे कुटुंब आहे", तेव्हा ते मला विकसित भारताच्या उभारणीसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहित करते. विकसित भारतासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करू आणि हे लक्ष्य साध्य करू. हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे!, असेही आपल्‍या पाेस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

सात टप्प्यांत मतदान, ४ जून रोजी निकाल

निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी  शनिवारी (दि.१६) लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखांची घोषणा केली.  लोकसभा निवडणूक २०२४ साठी ७ टप्प्यांत मतदान होईल आणि ४ जून रोजी मतमोजणी होईल. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी, दुसरा टप्प्यातील मतदान २६ एप्रिल रोजी, तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी, चौथ्या टप्प्यातील मतदान १३ मे रोजी, पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी, सहाव्या टप्प्यातील मतदान २५ मे रोजी आणि सातव्या टप्प्यांतील मतदान १ जून रोजी होईल आणि मतमोजणी ४ जून होईल, असे राजीव कुमार यांनी सांगितले.

१२ राज्यांमध्ये महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक

२०२४ हे जगभरात निवडणुकीचे वर्ष आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताकडेही जगाचे लक्ष आहे. १६ जूनला सध्याच्या लोकसभेची मुदत संपत आहे. आता देशातील निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. देशात ९६.८ कोटी नोंदणीकृत मतदार आहेत. १०.५ लाख मतदान केंद्र आहेत. दीड कोटी मतदार अधिकारी निवडणुकीचे काम पाहतील. तर ५५ लाख ईव्हीएम, ४ लाख वाहने असतील. १ कोटी ५२ लाख नवीन मतदार आहे. १०० वर्षावरील २ लाख मतदार आहेत. १ हजार पुरुष मतदारांमागे ९४८ महिला मतदार आहेत. नवीन महिला मतदारांची संख्या ८५ लाख आहे. १२ राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार अधिक आहे, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

आमच्याकडे १.८ कोटी पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत. १९.४७ कोटी मतदार २०ते २९ वयोगटातील आहेत. दिव्यांगाना घरातून मतदान करता येणार असल्याचे ते म्हणाले. निवडणूक यंत्रणा प्रत्येक मतदार केंद्रावर पोहोचणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

निवडणुकीत कुठेही हिंसेला स्थान नाही

निवडणुकीत कुठेही हिंसेला स्थान नसेल. त्यासाठी राजकीय पक्षांनी याची खबरदारी घ्यावी. जिथून आम्हाला हिंसाचाराची माहिती मिळेल, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू. निवडणुकीत पैशाचा गैरवापरही होऊ देणार नाही. असा इशारा राजीव कुमार यांनी दिला आहे. "राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड, मिझोराम, मेघालय, नागालँड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि त्रिपुरा या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये सुमारे ३,४०० कोटी रुपयांच्या रोकड जप्त करण्यात आली होती. ही वाढ ८३५ टक्के एवढी दर्शवते…" तसेच राजकीय पक्षांनी जबाबदारीने सोशल मीडियाचा वापर करावा. अफवा रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जातील. राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांपर्यंत ॲडव्हायजरी पोहोचवली जाईल, असेही ते म्हणाले.