yuva MAharashtra संत तुकाराम महाराजांची जीवनगाथा

संत तुकाराम महाराजांची जीवनगाथा



सांगली समाचार - दि. २७ मार्च २०२४
देहू - तुकोबारायांचा जन्म माघ शुद्ध पंचमी,शके १५३० मध्ये झाला. पुण्यापासून उत्तरेस असलेल्या अवघ्या २८ किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले देहू ग्राम हे तुकाराम महाराजांचे जन्मगाव. संत तुकारामांच्या अनेक पिढ्या विठ्ठल भक्तीमार्गात होत्या. 

देहू या पुण्यक्षेत्री महान विठ्ठलभक्त श्री विश्वंभर मोरे राहात असत. ते दर एकादशीला पंढरीची वारी करीत. त्यांची पत्नी आमाबाई ही पतीप्रमाणेच धर्मपरायण होती. देहू गावातील विठ्ठल मंदिर त्यांनीच बांधले. श्री विश्वंभर आणि आमाबाई यांच्या सातव्या पिढीतील वडिल बोल्होबा आणि आई कनकाई यांच्या पोटी संत तुकारामांचा जन्म झाला. 


देहूच्या धुळीत, विठ्ठलभक्तीरसात तुकारामांचा देह वाढला. तेसुद्धा आषाढी- कार्तिकीत नित्यनेमाने पंढरीची वारी करीत. पहिल्या वारीतच पंढरपूर निवासी विठ्ठलाचे सुंदर रूप त्यांना डोळ्यापुढे दिसू लागले. देवळात विठ्ठलनामाचा गजर होऊ लागला. टाळ-मृदंगाच्या निनादात विठ्ठलभक्त रमलेले. तुकाराम महाराजही हरिनामी रंगले अन् देहभान विसरून विठ्ठलाचे गुणगान करते झाले. सतत नामचिंतन आणि मनामध्ये एकच ध्यास लागल्याने तुकाराम महाराज देहात्मबुद्धीच्या पलीकडे गेले. भौतिक जगाचे खरे स्वरूप त्यांनी ओळखले. आता त्यांचे हृदय पूर्णपणे शुद्ध झाले होते. तुकोबांनी प्रपंचाची होळी करून परमार्थ साधला.

तुकाराम महाराजांच्या गाथांबद्दल प्रसिद्ध कथा...

गावात आणि आसपास काही पढीक पंडित आणि केवळ जन्मसिद्ध उच्चवर्णाचा अधिकार मिळालेले दांभिक लोक होते. अज्ञानी लोकांना नसता परमार्थ सांगून गंडे, दोरे, ताईत देऊन त्यांच्याकडून द्रव्य उपटीत होते. तुकोबा लोकांना परमार्थ सांगतात, कीर्तन करतात, कीर्तनासाठी हातात वीणा घेऊन उभे राहतात. 

अभंग रचून त्यावर निरूपण करतात, वेदान्त बोलतात, तत्त्वज्ञान सांगतात, हे त्या लोकांना रुचेना. तुकारामांसारखा एक शूद्र वाणी अभंगरचना करतो, लोकांना आपल्या नादी लावतो, लोक त्याच्या बोलण्याने भारावून जातात, त्याच्या पाया पडतात हे त्या अहंकारी मंडळींना साहवेना. त्यामध्ये अग्रणी होता, मंबाजीबुवा. मंबाजी वेदवेदांग विशारद ब्राह्मण रामेश्वर शास्त्रीकडे गेला. त्या वेळी पुण्याच्या ईशान्येस १५ कि.मी. अंतरावर वाघोली येथे ते राहात असत. त्यांची विद्वत्ता आणि शास्त्राध्ययन इतके थोर होते की, लोक त्यांना धर्माधिकारी म्हणून ओळखायचे. त्यांचे अध्ययन थोर, पण हे सारे ज्ञान बुद्धीत होते, ते अनुभवांत उतरले नव्हते. तुकाराम लोकांना वेदांच्या शिकवणी देतात हे रामेश्वर शास्त्री यांना रुचले नाही. हे पाहून शास्त्रींनी आदेश दिला. "तुकारामांनी तात्काळ त्यांचे सर्व अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकावेत." हा आदेश ऐकून तुकोबा वाघोलीस गेले.

तुकाराम महाराज म्हणाले, "पांडुरंगाने आज्ञा केल्यामुळेच मी कवित्व करीत होतो, पण आपण ब्राह्मण आहात. आपल्या आज्ञेप्रमाणे मी वागेन. "तुकारामांनी पूर्णपणे भगवंतावर विसंबून आपली गाथा डोहामध्ये सोडून दिली. तिथेच तिरावर ते भान हरपून बसले. या गाथा साक्षात पांडुरंगानेच त्यांना परत आणून दिल्या, अशी मान्यता आहे.