Sangli Samachar

The Janshakti News

स्व. बाळासाहेबांनी ठेवलेल्या जाणिवेला उध्दव ठाकरे चूड लावणार का ?सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
मुंबई - स्व. बाळासाहेब ठाकरेंची आज प्रकर्षाने आठवण झाली. विषय... सांगलीच्या काँग्रेसची जागा घेण्याची. कोल्हापूरच्या बदल्यात महाविकास आघाडीने सांगलीची जागा ठाकरे गटाला बहाल केली. यामागे मोठे षडयंत्र आहेच. पण उद्धव ठाकरेंनी यात सहभागी व्हायला नको होते, असा सूर काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते व नेत्यांमधून तसेच जनतेमधून उठत आहे.
मुंबई  -  बाळासाहेबांनी संपूर्ण आयुष्यात कधीही स्व. दादांना किंवा दादा घराण्याला विरोध केला नव्हता. यामागचे कारणही सर्वज्ञात आहे. शिवसेनेच्या उदयाच्या काळात स्व. दादांनी स्व. बाळासाहेबांना केलेल्या मदतीची जाण त्यांनी शेवटपर्यंत  ठेवली होती. परंतु पिढी बदलली, दिवस बदलले, राजकारण बदलले... आता तत्वाला तिलांजली म्हणजेच राजकारण मानले जाते...


महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून लोकसभा निवडणूक लढण्याचे ध्येय ठेवून तयारीला सुरुवात केली आहे. मात्र, कोणत्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार, याबाबत स्पष्टता दिली नव्हती. आता चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन काँग्रेसच्या विशाल पाटील यांच्या अडचणीत वाढ केली आहे.

कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे गट ) द्यावा, अशी भूमिका गटाने घेतल्यानंतर चंद्रहार पाटलांना मातोश्रीवर बोलवण्यात आले होते. झालेल्या चर्चेनंतर महाविकास आघाडीकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. मात्र, त्यावर बुधवारी अंतिम निर्णय होणार आहे.

चंद्रहार पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मातोश्री'वर जाऊन भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवणार असल्याचे निश्चित होत असताना सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, बुधवारी यावर अंतिम चर्चा होणार असली तरी ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्याकडून आढावा घेतला. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांच्या नावाला समंती दर्शवली असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीनेही चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देत सांगली लोकसभा मतदारसंघातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याने महायुतीपेक्षा महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून तयारी ठेवली आहे. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अनेक कार्यक्रम घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. आता काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्यास महाविकास आघाडीत वाद निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. उद्या महाआघाडीत काय निर्णय होतो, आणि विशाल पाटील निर्णय घेतात, याबाबत कार्यकर्ते व जनतेत चर्चा सुरू झाली आहे... पण जे घडले, किंवा घडण्याची शक्यता आहे, ते मात्र योग्य नव्हे हेच खरे, अशी प्रतिक्रिया उमटत आहे...