सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. आचारसंहितेमुळे राज्य सरकारच्या जाहिरातबाजीलाही आळा बसला आहे. राज्य सरकारच्या विविध जाहिराती आता सार्वजनिक ठिकाणे, एसटी बसवरून हटवण्यात येणार आहेत. त्यानुसार राज्य सरकारने एसटी बसवर 'निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान' या जाहिराती लावल्या होत्या. या जाहिरातीसह इतर राजकीय जाहिराती तत्काळ हटवण्याच्या सूचना एसटी महामंडळाने संबंधित विभाग नियंत्रक, आगार व्यवस्थापकांना दिल्या आहेत.
आचारसंहिता लागू झाल्याने आचारसंहितेचा भंग होऊ नये, म्हणून राजकीय जाहिराती काढून टाकण्यास सुरुवात झाली आहे. एसटी बसवर जाहिरात करणारे परवानाधारक 'मे. प्रोॲक्टिव इन आऊट ॲड प्रा. लि.' यांच्या मार्फत बसवरील राजकीय जाहिराती काढून टाकण्यात येत आहेत. परंतु सर्व आगारात या जाहिरातदारांचे मनुष्यबळ नसल्याने एसटी महामंडळाला स्वतः पुढाकार घेऊन जाहिराती हटवाव्या लागणार आहेत. जाहिरात काढण्यासंदर्भातील खर्चाची रक्कम संबंधित परवानाधारक जाहिरातदारांकडून वसूल केली जाणार आहेत
राजकीय जाहिराती काढण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई
एसटी महामंडळातील संबंधित आगारातील बसवरील राजकीय जाहिरात आगारातील अधिकारी-कर्मचारी यांनी संबंधित टाळाटाळ केल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी प्रत्येक स्तरावरून घेण्यात यावी, अशा सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.