Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेसची गॅरंटी हिंदुस्थानचा आवाज, जनतेची मते विचारात घेऊन बनवली गॅरंटी



सांगली समाचार - दि. १८ मार्च २०२४
मुंबई  - कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा केल्यामुळे हिंदुस्थान जवळून पाहण्याची संधी मिळाली. मी जो हिंदुस्थान समजत होता त्यापेक्षा तो वेगळा असल्याचे या यात्रेतून समजले. भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले त्यामुळे दुसऱ्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आल्या. ही गॅरंटी काँग्रेस पक्ष, मल्लिकार्जून खरगे वा राहुल गांधीची नाही तर तो हिंदुस्थानचा आवाज आहे, जनतेची मते विचारात घेऊन गॅरंटी दिलेली आहे, असे खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

मुंबईत आयोजित न्याय संकल्प सभेत खासदार राहुल गांधी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने जनतेला विचारून, सर्वांची मते विचारात घेऊन या गॅरंटी दिल्या आहेत. भारतीय जनता पक्ष हे करु शकत नाही कारण त्यांच्याकडे सर्वकाही वरून येते. भाजपात केंद्रीकृत पद्धत आहे. सर्व काही नरेंद्र मोदी सांगतात तसेच चालते. आरएसएस व त्यांच्यामते ज्ञान एकाच व्यक्तीजवळ आहे, कामगार, शेतकरी यांना काहीच समजत नाही. बेरोजगाराला काही माहितीच नाही, असे ते समजतात. 


देशातील सर्वात विद्वान शास्त्रज्ञानाजवळ जेवढे ज्ञान आहे तेवढेच ज्ञान शेतकऱ्याजवळ आहे. बीडी कामगार महिलांच्या हातात जे कौशल्य आहे त्याचा आदर केला जात नाही, त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे, आर्थिक मदत करा, मग बघा किती फरक पडतो, त्यांच्या हातातून मेक इन इंडिया घडतो. हिंदुस्थान द्वेषाचा देश नाही तर प्रेमाचा देश आहे. भारतीयांच्या डीएनएमध्येच आदर, प्रेम भरपूर आहे. हिंदुस्थान हा जगातील पहिला देश आहे ज्याने स्वातंत्र्याची लढाई प्रेमाने लढली. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याची प्रेरणा भारताकडून मिळाली, गांधीजींचे तत्वज्ञान व दिशा मिळाली त्यातूनच दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले. हिंदुस्तान प्रेमाचा देश आहे तर त्यात द्वेष का परवला जातो? तर या द्वेषाचे कारण अन्याय आहे. गरिब, शेतकरी, दलित, महिला, तरुण या घटकांवर अन्याय होत आहे. देशातील केवळ दोन तीन टक्के लोकांना न्याय मिळतो, त्यांच्यासाठी न्यायपालिका काम करतात, सरकार काम करते, सर्व संस्थांमध्ये त्यांना स्थान आहे पण ९० टक्के लोकांवर सातत्याने अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघाला तेव्हा असे सांगितले गेले की, कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी बनेल, त्याची सवय बिघडले मग २०-२२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले तर त्यांची सवय बदलत नाही का ? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. गरिब, आदिवासी, मागास, वंचित, शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करुन २०-२२ धनदांडग्यांची घरे भरली जात आहेत.

भारत जोडो यात्रेत केवळ राहुल गांधी चालला नाही तर हिंदुस्थानातील कोट्यवधी लोक पायी चालले, कोट्यवधी लोकांची जी भावना आहे त्यातील मी एक आहे. या यात्रेची शक्ती देशातील जनता आहे आणि ही लढाई आपल्याला एकत्र लढायची आहे. मोदी-राहुल, भाजपा-काँग्रेस यांच्यातील ही लढाई नाही तर देशाच्या स्वभावातील दोन आत्म्यांमधील ही लढाई आहे. एक आत्मा म्हणतो हिंदुस्थान मध्यातून चालवावा, वरून आदेश देऊन चालवावा आणि दुसरा म्हणतो विकेंद्रीकरण करून सर्वांची मते विचारात घेऊन चालवला पाहिजे. घाबरू नका, भाजपा सत्तेत येईल व संविधान बदलेल असे काही होणार नाही, भाजपा असे काहीही करू शकत नाहीत आणि त्यांच्यात तेवढी धमकही नाही पण सत्य व हिंदुस्थान आपल्याबाजूने आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.

खासदार राहुल गांधी यांनी सकाळी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली पाहिली त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली, या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत महासचिव प्रियंका गांधी, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पदयात्रेनंतर न्याय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती.