Sangli Samachar

The Janshakti News

शरद पवार यांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण;

 


सांगली समाचार- दि. १ मार्च २०२४

बारामती - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना गोविंद बागेत जेवणाचे निमंत्रण दिले आहे. गेल्या काही महिन्यांतील घडामोडी पाहता पवार यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे दिलेले निमंत्रण चर्चेचा विषय ठरला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेस, एससीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहीले आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रीमंडळाला बारामती येथील निवासस्थानी २ मार्च रोजी जेवणाचे निमंत्रण या पत्रातून देण्यात आले आहे. 

पत्रात लिहीले आहे की, 'राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री प्रथमच बारामतीत येत आहेत. बारामतीतील नमो महारोजगार कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्यांनी दिलेल्या भेटीबद्दल मला खूप आनंद झाला आहे. त्यामुळे तुम्हाला मी माझ्या घरी भोजनाचे निमंत्रण देऊ इच्छितो. तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळातील इतर सर्व सहकाऱ्यांसह आमच्या घरी जेवायला हे आमचे आग्रहाचे निमंत्रण आहे..'

शरद पवार यांनी दिलेल्या या निमंत्रणाच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यांच्या निमंत्रणानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्या घरी जाणार हा विषय खूप रंगला आहे. राज्यात आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर कोण कोणत्या पक्षात प्रवेश करणार या चर्चांमध्ये आता शरद पवार यांनी दिलेल्या या निमंत्रणाच्या विषयाची आणखी भर पडली असल्याच्या चर्चा आहेत.