Sangli Samachar

The Janshakti News

केंद्रीय मंत्री गडकरी यांची मल्लिकार्जुन खरगे यांना कायदेशीर नोटीससांगली समाचार - दि. १ मार्च २०२४
नागपूर  - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. अशात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाखतीचा काहीसा भाग पोस्ट केल्याने काँग्रेस अध्यक्ष आडचणीत आले आहे. या प्रकरणी गडकरी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस महासचिव जयराम रमेश यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नितीन गडकरी यांचा दिशाभूल करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल गडकरी यांच्यावतीने महाराष्ट्र भाजपच्या सोशल मीडिया टीमने ही कायदेशीर नोटीस दिली आहे. या नोटीसद्वारा, चुकीची माहिती पसरवत आणि राजकीय फायदा मिळवण्यासाठी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. असा प्रकार कोणत्याही किंमतीत खपवून घेतले जाणार नाही, असं महाराष्ट्र भाजपनं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 'द लॅलनटॉप'ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीची 19 सेकंदाची क्लिप काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ही क्लिप सोशल मीडियात खूप व्हायरल झाली.काय आहे क्लिपमध्ये

सोशल मीडियत व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आज गावातील गरीब, मजूर , शेतकरी दु:खी आहेत, असं म्हणत असल्याचे नितीन गडकरी दिसत आहेत. गावात चांगले रस्ते, पिण्यासाठी शुद्ध पाणी, चांगली रुग्णालये आणि चांगल्या शाळा नाहीत म्हणून दुःखी असल्याचं गडकरी म्हणत असल्याचं या क्लिपमध्ये दिसत आहे. कॉंग्रेसने या व्हिडिओवरुन भाजपावर निशाणा साधत सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला. सोबत कॅप्शन देत काँग्रेसने लिहिलंय, ' मोदी सरकारचे मंत्री म्हणतात, आज शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा भाव मिळत नाही. मोदी सरकारमध्ये गावे आणि आदिवासी भाग अडचणीत आहे.' सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये गावातील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचं गडकरी बोलताना दिसत आहेत. मात्र, कॉंग्रेसने शेअर केलेला काही सेकंदाचा व्हिडिओ लोकांची दिशाभूल करणारा आहे. 'द ललनटॉप'मधील नितीन गडकरींची ही संपूर्ण मुलाखत 1 तास 42 मिनिटांची आहे. या व्हिडिओमध्ये 15:20 ते 15:45 च्या टाइमस्टॅम्प दरम्यान, नितीन गडकरींना शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न विचारला गेलाय. त्या प्रश्नाचे उत्तर गडकरी देत आहेत. मात्र, काँग्रेसने अर्धवट व्हिडिओ शेअर करत जनतेची फसवणूक केल्याचा आरोप भाजपाने केला आहे.