गेल्या गुरुवारी मुंबईत महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक सुरू होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत अर्ध्यावर बैठक सोडून मिरज येथील संवाद यात्रेसाठी निघून गेले. सांगलीच्या जागेचा तिढा सुटला नाही, त्यामुळे काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार सुमन आर. आर. पाटील, युवा नेते रोहित पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी कार्यक्रमास जाणे टाळले. उद्धव हे मिरज येथील कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी सांगलीत पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचे चार ते पाच समर्थक हॉटेलवर पोहोचले. मिलिंद नार्वेकर यांच्या माध्यमातून नेत्यांच्यावतीने भेटायला आल्याचा निरोप उध्दव ठाकरे यांना दिला. यानंतर तासभर खलबते झाली. त्यानंतर उद्धव यांनी मिरज येथील मेळाव्यात थेटपणे चंद्रहार पाटील यांची उमेदवारीच जाहीर केली.
हा अप्रत्यक्ष कोण ?
खासदार संजय राऊत असे म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून भाजपला अप्रत्यक्ष मदत करणार असाल, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यावर आम्ही काय बोलणार ? हा अप्रत्यक्ष कोण?
राष्ट्रवादी पक्षात काही भाजपप्रेमी
भाजपचा खरोखरच पराभव व्हावा असे महाविकास आघाडीला वाटत असेल, तर त्यांनी हातकणंगले मतदारसंघात मला पाठिंबा द्यावा. शिवसेना पाठिंब्यासाठी सकारात्मक आहे, मात्र अजूनही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षात काही भाजपप्रेमी लोक आहेत. तेच माझ्या पाठिंब्यामध्ये अडथळे आणत आहेत, असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोणाचेही नाव न घेता केला आहे.
सांगलीबाबत मौन का ?
राष्ट्रवादीचा हा नेता भिवंडी, जालना, दक्षिण मध्य मुंबई आदी जागांबाबत बोलतो, मात्र सांगली लोकसभा मतदारसंघाविषयी मौन का पाळतो ? ते सांगली जिल्ह्यातील असताना मौन का ? भाजपला त्यांनी काही शब्द तर दिला नाही ना ? अशी चर्चा रंगलेली आहे.