Sangli Samachar

The Janshakti News

भाजपच्या नेतृत्वाची दहशत कमी होतेय का?सांगली समाचार - दि. ५ मार्च २०२४
नवी दिल्ली - कुणीही जास्त वेळ श्वास कोंडून ठेवू शकत नाही. ठेवलाच तर त्याच्या जिवाला धोका होण्याची एक शक्यता असते. त्यामुळे श्वास कोंडून ठेवण्याला निश्चित मर्यादा असते. लोकसभा निवडणुकीसाठी  भाजपची  पहिली यादी जाहीर झाली आणि याचा प्रत्यय यायला सुरुवात झाली. मिळालेली उमेदवारी नाकारणे, उमेदवारी न मिळाल्यामुळे राजकारणातून संन्यास घेणे, पहिल्या यादीत नाव नसल्याने उमेदवारीचा दावा मागे घेणे, असे प्रकार पहिली यादी बाहेर आल्यानंतर झाले. शीर्ष नेतृत्वावर जाहीरपणे कुणी नाराजी व्यक्त करू शकत नाही, इतकी दहशत भाजपमध्ये आहे. मात्र, अशी परिस्थिती कायम राहू शकत नाही, याचे संकेत आता मिळू लागले आहेत.

भाजपमध्ये मोठे इनकमिंग सुरू आहे. चौकशीचा ससेमिरा लागणार, याची शक्यता वाटली की काँग्रेसमध्ये सर्व सत्तापदे उपभोगलेले नेतेही शरण जात आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष कमकुवत होत असल्याचे आणि भाजप आणखी शक्तिशाली होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अन्य पक्षांतील नेत्यांना प्रवेश दिल्याने फायदा होईल, असे भाजपला वाटत असले तरी अंतगर्त समीकरणे बिघडत आहेत. निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होत आहेत. आयुष्यभर ज्या नेत्यांना विरोध केला, त्यांचाच प्रचार करण्याची, त्यांना नेते म्हणण्याची वेळ निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आली आहे. विरोधी पक्ष असूच नये, तो संपला पाहिजे, ही भूमिकाही अनेक कार्यकर्त्यांना आवडत नसल्याचे चित्र आहे. याची जाणीव भाजपला नसेल, असे म्हणता येणार नाही. मात्र, काहीही करून लोकसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळवले पाहिजे, यासाठी हे सर्व केले जात आहे.


निवडणुका जिंकण्यासाठी एखादा पक्ष प्रयत्न करत असतो, त्याला कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. निवडणुका जिंकण्याच्या आणि सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी भाजपने सर्व संकेत मोडीत काढले आहेत. नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे मग कार्यकर्त्यांनी त्या नेत्यांविरोधात या आरोपांची राळ उठवायची आणि तोच नेता भाजपमध्ये येणार... अशा प्रकारांना आता निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी कंटाळले आहेत.

भाजप वगळता अन्य पक्षांत अशी परिस्थिती निर्माण झाली असती तर एव्हाना त्याचा उद्रेक झाला असता, पण भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांसाठी पक्षशिस्त ही सर्वोपरी आहे. ते पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन सहसा करत नाहीत, मात्र असे असले तरी भाजपने कार्यकर्त्यांना जास्तच गृहीत धरले की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. उमेदवारांची यादी जाहीर व्हायच्या आधीच भारताचे माजी क्रिकेटपटू, भाजपचे दिल्लीचे खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणातून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले. त्यांना उमेदवारी मिळणार नव्हती, असे सांगितले जात आहे. आता क्रिकेटशी संबंधित बाबींवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे गंभीर यांनी सांगितले आहे.

दिल्लीच्या चांदणी चौक मतदारसंघातून माजी केंद्रीय आरोग्यमंत्री, खासदार डॉ. हर्षवर्धन यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनीही राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे जाहीर केले आहे. देशातील पोलिओ निर्मूलन मोहिमेत डॉ. हर्षवर्धन यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे, याचा एकेकाळी भाजपकडून मोठा गवगवा करण्यात आला होता. आता त्यांनाच उमेदवारी नाकारण्यात आली आहे. हर्षवर्धन हे कान, नाक, घसा तज्ज्ञ असून, आता मूळ व्यवसायाकडे वळणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि या यादीत नाव असलेल्या एका भोजपुरी अभिनेत्याने दुसऱ्याच दिवशी निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. पवन सिंह असे या अभिनेत्याचे नाव आहे. त्यांना पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू कायम असून, भाजपकडून उमेदवारी मिळाली की आपला विजय निश्चित, असे गृहीत धरून अनेकजण उमेदवारीसाठी अक्षरशः रांगेत उभे आहेत. असे असताना पवन सिंह यांनी उमेदवारी नाकारून निवडणूक लढवण्यासाठी असमर्थता दर्शवल्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

एकाधिकारशाही आहे की काय?

गुजरातमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. गुजरातेतील 15 मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मेहसाणा मतदारसंघातून भाजपचे नेते नितीन पटेल यांनी उमेदवारी मागितली होती, मात्र उमेदवार जाहीर झालेल्या या मतदारसंघांत मेहसाणाचे नाव नाही. नितीन पटेल हे गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री आहेत. पहिल्या यादीत नाव न आल्याने त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला. पहिली यादी जाहीर झाली, मात्र त्यात मेहसाणाचा समावेश नव्हता. मेहसाणासाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे, त्याआधीच मी माझ्या उमेदवारीसाठीचा अर्ज मागे घेत आहे, असे नितीन पटेल यांनी जाहीर केले आहे. भाजपमध्ये एकाधिकारशाही आहे की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. त्याला आक्रमकपणे विरोध करणे, बंडखोरी करणे सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे नेत्यांनी आता शांततेत विरोध सुरू केला आहे.