Sangli Samachar

The Janshakti News

विरोधकांची वणवण.. भाजपकडून 3 महिने राज्यातील 90 टक्के हेलिकॉप्टर बुक
सांगली समाचार - दि. ५ मार्च  २०२४
मुंबई  - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने ३ महिन्यांसाठी राज्यातील ९० टक्क्यांवर हेलिकॉप्टर बुक केले आहेत. गेल्या वर्षी जून-जुलैपासूनच पक्षाने हेलिकाॅप्टर्सचा शोध सुरू केला. ऑक्टोबरपर्यंत बुकिंग पूर्ण झाली. त्यामुळे आता विरोधकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

भाजपने देशभरात ही बल्क बुकिंग केल्याने परराज्यातूनही हेलिकॉप्टर मिळण्याची शक्यता कमीच आहे. निवडणुकीत दीडपट अधिक भाडे लागले. परंतू, अँडव्हान्स बुकिंगमुळे भाजपाला ही हेलिकॉफ्टर्स ताशी ५-४ लाखांत मिळाली असल्याचेही समजते. विमानांसाठी एअरस्ट्रीप लागते. पण, हेलिकॉप्टर तात्पुरत्या हेलिपॅडवर उतरता येतात म्हणून त्यांना निवडणूकीच्या काळात प्रचारासाठी प्रचंड मागणी असते. भारतात खासगी हेलिकाॅप्टरही ३०० वर जाऊ शकलेले नाही.अरिहंत एव्हीएन्सचे संचालक प्रविणकुमार जैन म्हणाले, ३ महिन्यांचे बुकिंग फुल्ल आहे. दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ५ दरम्यान किमान ३ तास, तर महिन्याकाठी ९० तासांच्या उड्डाणाचा करार असतो. जास्त उड्डाणासाठी तासाप्रमाणे पैसे लागतात. काम नसेल तर हॅलिकॉप्टर उभे ठेवतो. यामुळे पैसे मोजूनही अन्य पक्षांना हॅलिकॉप्टर मिळत नाही. सर्वच पक्षांकडून ७-८ महिन्यांपासून विचारणा सुरू आहे. भाजपचे व्यवहार पारदर्शक असल्याने त्यांनाच प्राधान्य देतो. ते बल्क बुकिंग देतात, असेही ते म्हणाले.

उद्धवसेना, ममतांनीही वर्तवली चिंता 
प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी ऑगस्टमध्ये भाजपने सर्व हेलिकॉप्टर बुक केल्याचा दावा केला होता, तर उद्धव ठाकरे सेनेच्या मुखपत्रातूनही भाजपने विरोधकांची अडचण केल्याचा आरोप केला होता.

प्रचारासाठी फक्त २० हेलिकॉप्टर 
हेलिकॉप्टरचे निश्चित वेळापत्रक नसून त्यांना 'नॉन शेड्युल्ड ऑपरेशन परमिट' (एनएसओपी) म्हणतात. डीजीसीएच्या (डिसेंबर २०२३) अहवालानुसार देशातील १९१ हेलिकॉप्टरपैकी १९ विविध राज्यांच्या मालकीचे आहेत. महाराष्ट्रातील ७१ हेलिकॉप्टरपैकी ग्लोबल वेक्ट्रा एव्हिएशनचे ३०, हॅलिगोचे १५ आहेत. या कंपन्या राज्य शासन, ओनएजीसीला सेवा देतात. खासगी, कंपन्या, कॉर्पाेरेट्स वगळता १८ ते २० प्रचारासाठी उरतात. त्यातील ९०% एकट्या भाजपने बुक केल्याचे सूत्रांनी सांगितले.​​​​​​​