Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभा निवडणुकीतील खर्चासाठी दर निश्चित !



सांगली समाचार - दि. १५ मार्च २०२४
नवी दिल्ली - लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्यांना ९५ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली असून, त्यासोबत निवडणूकीत उमेदवारांकडून विविध बाबींवर होणाऱ्या खर्चाला लगाम घालण्यासाठी आयोगाने दरनिश्चितही केली आहे. कोणतीही निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांकडून निवडणूक आयोगाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून प्रचंड खर्च करण्यात येतो. साध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ३ ते ४ कोटी उधळणाऱ्या धनदांडग्या उमेदवारांच्या तुलनेत लोकसभा निवडणुकीसाठी केला जाणारा खर्च किती असेल याचा अंदाज येऊ शकतो. या पार्श्वभूमीवर लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्यांना ९५ लाख रुपयांपर्यंत खर्चाची मर्यादा घालून देण्यात आली असून, त्यासोबत निवडणूकीत उमेदवारांकडून विविध बाबींवर होणाऱ्या खर्चाला लगाम घालण्यासाठी आयोगाने दरनिश्चितही केली आहे. प्रचारावेळी सभा, बैठका, जाहीर सभा, रॅली अशा सर्व ठिकाणच्या खर्चावर प्रशासनाची करडी नजर असेल. त्यासाठी पथके तैनात केली जाणार असून उमेदवारांना वेळोवेळी प्रशासनाकडे त्यांच्या खर्चाचा तपशील सादर करावा लागणार आहे.

मतदारांना ५०० ते २००० रुपयांपर्यंत खर्चाचे आमिष दाखविण्यापासून ते कार्यकर्त्यांवर सढळ हाताने पैसे खर्चून मतांचे दान पदरात पाडून घेण्यासाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे कार्यकर्ते कम नोकर राबत असतात. लोकसभा निवडणूक कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच निवडणूक आयोगाने विविध साहित्याचे दर घोषित केले आहेत. त्यानुसार एक कप चहासाठी १२ रुपये तर मिसळ पाव, पावभाजीच्या एका प्लेटसाठी ६५ रूपये दर असणार आहे. मोठ्या प्रमाणात होणारा विविध साधनांचा वापर पाहता निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चावर बंधने घालून दिली आहेत. त्यानुसार प्रचारावेळी नेत्यांच्या स्वागतासाठी वापरण्यात येणाऱ्या अडीच फुटांच्या सफारी हारासाठी १३० रूपये तर ७ ते ९ फुटांच्या हारासाठी ४५० रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. प्रचार साहित्य, फ्लेक्स, स्टेज, स्टीकर तसेच प्रसारमाध्यमांमधील जाहिरातीचे दरही या यादीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत. 
उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच्या वाहनांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. ऑटो रिक्षाला २४० किलोमीटरसाठी ८८० रूपये, १२० किलोमीटरसाठी ४४० रूपये, जीप, टेम्पो, टॅक्सी, बोलेरो, टाटा व्हीक्ट्रा, क्वालिस, तवेरा या गाडयांचे प्रतिदिन २४० किलोमीटरसाठी २७५० तर १२० किलोमीटरसाठी १३७५ रूपये दर असतील. या रकमेत इंधन खर्चाचाही समावेश आहे.


जाहीर सभांसाठी वापरण्यात येणाऱ्या १२५ केव्ही जनरेटरसाठी प्रतिदिन १५ हजार रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय ध्वनीवर्धक संचासाठी प्रतिदिन ६ हजार रूपये, ट्यूबलाईट ५० रुपये, हॅलोजन ७० रुपये असे दर असतील. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या यादीनूसार अर्धा कप चहासाठी ६ तर फुल कपासाठी १२ रुपये दर मंजूर आहे. कॉफीच्या एका कपासाठी १२ रुपये, वडापावसाठी १२ रूपये, भजी, पोहे, कचोरी, फरसाणसाठी १५ ते २० रुपये दर असतील. तर शाकाहारी जेवणासाठी १५० रुपये व नॉनव्हेज थाळीसाठी २५० रूपये दर निश्चित करण्यात आला आहे. पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये दर असेल.