Sangli Samachar

The Janshakti News

खुनी हल्ल्यातील संशयितांचा तत्काळ छडा, दोघांना अटक; पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचे स्पष्ट

 


सांगली समाचार  दि. १ मार्च २०२४

सांगली - येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम (वय ४०, रा. खणभाग) याच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी संशयित आदित्य उर्फ मॅक्सी रमेश भारती (वय १९, तिवारी गल्ली), आर्यन चंद्रकांत देशमुख (वय १८, पाटणे गल्ली) या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची दोघांनी कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आदित्य भारती याचे वडील रमेश भारती आणि जखमी प्रशांत कदम हे काही दिवसांपूर्वी मद्यप्राशन करण्यास बसले होते. तेव्हा भारती यांचा हृदयविकाराच्या धक्कयाने मृत्यू झाला. परंतू भारती यांच्या मृत्यूबद्दल आदित्य याला प्रशांतवर संशय होता. त्यामुळे तो प्रशांतवर चिडून होता. त्यांच्यात वादही झाला होता. दि. २८ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास प्रशांत हा खणभागातील ओंकार कट्टयावर बसला होता. तेव्हा जुन्या भांडणाचा राग मनात धरून आदित्य व आर्यन या दोघांनी प्रशांतचा खून करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर वार करण्यास सुरवात केली. डोके वाचवण्यासाठी त्याने हात डोक्यावर घेतले. त्यामुळे हातावर वार होऊन तो जखमी होऊन खाली पडला. तेव्हा दोघांनी त्याच्या पायावर व पोटावरही वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दोघेजण अंधारात पळून गेले.

सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याबाबत रेखा योगेश पवार (वय ४३, रा. हनुमाननगर, कुपवाड) यांनी फिर्याद दिली. याचा तपास करताना दोघे संशयित धामणी रस्त्यावरील उष:काल हॉस्पिटलजवळ लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा दोघेजण अंधारात लपून बसल्याचे दिसले. दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खुनी हल्ल्याची कबुली दिली.

पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, रफीक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, गणेश कांबळे, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.

सज्ञान झाला गुन्ह्यात अडकला

संशयित आर्यन याला १८ वर्षे पूर्ण होऊन अवघा एक महिना झाला. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या तो सज्ञान समजला जातो. खुनी हल्ल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.