Sangli Samachar

The Janshakti News

अवयव दान प्रचार कार्याबद्दल डॉ. सौ. हेमा चौधरी यांचा महिला दिनानिमित्त ह्रद्य सत्कारसांगली समाचार - दि. १३ मार्च २०२४
मिरज - येथील श्री रेणुका कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ तसेच ग्राम विकास बहुउद्देशीय संस्था मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त डॉ. सौ. हेमा चौधरी यांचा मिरजेच्या हिजहायनेस पद्माराजे पटवर्धन यांच्या हस्ते, अवयव दान प्रसार व प्रचार कार्यासाठी ह्रद्य सत्कार करण्यात आला. श्री माधव जी लॉन्स आणि संस्कृती भवन येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. सौ. नंदा पाटील यांनी भूषवलेले होते.


डॉ. सौ. हेमा चौधरी या द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन या संस्थेच्या सांगली जिल्हा को- ऑर्डिनेटर म्हणून काम पाहतात. नेत्रदान, त्वचा दान, देहदान आणि अवयव दान याची योग्य व शास्त्रोक्त माहिती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी यासाठी फेडरेशन काम करते .
नेत्रदानामुळे अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते.त्वचा दानामुळे भाजलेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयव दानातून गरजू रुग्णांमध्ये अवयव प्रत्यारोपण करून जीवनदान देण्यात येत असते. गरज असते ती, समाजातील व्यक्तीनी अवयव दान करण्याची. आज समाजात डोळे व रक्तदान करण्यात अनेकजण हिरीरीने सहभाग घेत असतात. परंतु त्यामानाने अवयव व त्वचा दान करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे आणि ही गरज ओळखून, द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन संस्था विविध ठिकाणी प्रबोधनात्मक व्याख्याने घेऊन अवयव दानाचा प्रचार व प्रसाराचे कार्य करत असते. 

डॉ. सौ हेमा चौधरी व त्यांच्या सांगली टीम यांच्या प्रयत्नाने शेकडो लोकांनी अवयवदानाचे फॉर्म भरून दिलेले आहेत. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे काही व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी अवयव दान करण्यात पुढाकार घेतला आहे .
डॉ. सौ. हेमा चौधरी यांचे कार्य लक्षात घेऊन
हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना डॉ. सौ. चौधरी म्हणाल्या की, हे कार्य अधिक जोमाने करण्यासाठी हा पुरस्कार मला प्रेरणा देत राहील. याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.