Sangli Samachar

The Janshakti News

एकनाथ शिंदे युद्धात जिंकले, पण तहात हरले ? मुंबईच्या पाच जागा लागल्या सोडायला !सांगली समाचार दि. १४ मार्च २०२४
मुंबई - लोकसभा निवडणुकीची तारीख कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे, महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाचे त्रांगडे काही सुटताना दिसत नाही. प्रत्येक पक्ष एकाही जागेवर तडजोड करण्याच्या मनःस्थितीत नाही. असे असले तरी महायुतीत भारतीय जनता पक्ष शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत एकच जागा देण्याची तयारी दाखवत आहे. त्याची परतफेड त्यांना ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघ देऊन करण्याची खात्रीलायक माहिती आहे. मुंबई आणि ठाणे हे शिवसेनेचे गड राहिले आहेत, मात्र शिंदेंनी मुंबई भाजपला दिली तर गड राखण्यासाठी त्यांनी सिंह गमावला असेच म्हणावे लागेल.

मुंबई, ठाणे हे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत. मात्र मुंबईत शिंदेच्या शिवसेनेची ताकद राहिलेली नाही, असे कारण पुढे करत आणि अंतर्गत सर्वेक्षणांचा हवाला देत शिवसेनेच्या ताब्यातील दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. त्या बदल्यात शिंदेंना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेची ठाणेदारी आणि कल्याण मतदारसंघ सोडण्यात येणार आहे.


मुंबईमध्ये शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन खासदार 2019मध्ये निवडून आले. दक्षिण मुंबईतील अरविंद सावंत सोडल्यास बाकी दोघे शिंदेसोबत गेले. त्यामध्ये उत्तर पश्चिम मुंबईतून गजानन किर्तीकर आणि दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे सध्या शिंदेंसोबत आहेत.

दक्षिण मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई भाजपला मिळणार

दक्षिण मुंबई मतदारसंघात शिंदेची ताकद नाही, असे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत सर्वेक्षणात म्हटले आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजपला मिळाल्यास येथून विजयी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. असाच तर्क शिंदेंच्या ताब्यातील उत्तर पश्चिम मुंबईसाठी भाजपने लावला आहे. हे दोन्ही मतदारसंघ भाजपला मिळाल्यास दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाच्या अरविंद सावंत विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असण्याची शक्यता आहे. तर उत्तर पश्चिम मुंबईमधून सरप्राइज मिळण्याची शक्यता आहे.

शिंदेंच्या राहुल शेवाळेंनाच फक्त पुन्हा संधी 

राहुल नार्वेकर दक्षिण मुंबई मतदारसंघात अॅक्टिव्ह झाले आहेत. ठिकठिकाणी त्यांचे पोस्टर आणि बॅनर्स लागले आहे. या भागातील इमारतींच्या हाऊसिंग सोसायटी कार्यकारिणींसोबत त्यांचे कार्यकर्ते संपर्क करताना दिसत आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे गजानन किर्तीकर यांचा पत्ता कट करुन तिथे नवाच उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे, आता हा भाजपकडून असेल की शिवसेनेकडून हे अद्याप निश्चित नाही. मुंबईतील शिवसेनेच्या तीन जागांपैकी फक्त राहुल शेवाळेंनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. असे झाले तर शिवसेनेची सुरुवात ज्या मुंबईतून झाली तिथूनच शिवसेना हद्दपार झालेली 2024 च्या निवडणुकीत यला मिळणार आहे. भाजप मुंबईतील सहा पैकी पाच जागांवर लढताना दिसेल.

ठाणे, कल्याण राखण्यात शिंदेंना यश?

मुंबईवर पाणी सोडण्याच्या बदल्यात एकनाथ शिंदेना ठाणे आणि कल्याण मतदारसंघ देण्याची खात्रीलायक माहिती आहे. ठाणे हा शिंदेंचा बालेकिल्ला आहे, तर कल्याणमधून त्यांचे पूत्र डॉ. श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. कल्याण मतदारसंघातून भाजपचे अनेक नेते इच्छूक आहेत. संघाच्या कार्यकर्त्यांनीही हा मतदारसंघ भाजपला मिळावा अशी वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे. शिंदेंनी जागा वाटपाच्या तहात ठाणे आणि कल्याण स्वतःकडे राखण्यात यश मिळवल्याचे मानले जाते. ठाणे सध्या शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्या ताब्यात आहे. येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अर्थात ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत यला मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंकडून रवी फाटक किंवा नरेश म्हस्के ठाण्यातून इच्छूक आहेत. यापैकी राजन विचारेंना आता कोण टक्कर देतो हे शिंदेंना ठरवायचे आहे.